मुंबई, दि.25 (पीसीबी)
महायुती सत्तेवर आल्यापासून प्रशासकीय फेरबदलाची मालिका सुरूच आहे. मंगळवारी झालेल्या बदल्यांमध्ये १९९७च्या तुकडीचे डॉ. हर्षदीप कांबळे यांची ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कांबळे सध्या उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. मार्च २०२४मध्ये अनिल डिग्गीकर यांची ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली होती; परंतु त्यांच्याविषयी प्रशासनात कमालाची नाराजी होती. त्यातच कुर्ल्यात झालेल्या ‘बेस्ट’ बस अपघातानंतर डिग्गीकर यांनी तातडीने पावले उचलली नाहीत, असेही बोलले जात होते. त्यामुळेच अवघ्या नऊ महिन्यांत त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.
इतर बदल्यांमध्ये महाजेनकोचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक डॉ. अनबलगन यांची नियुक्ती उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर सध्या मुख्यमंत्र्यांचे सहसचिवपदी असलेले डॉ. राधाकृष्णन बी. यांची बदली महाजेनकोचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक म्हणून करण्यात आली आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांची बदली वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर येथे करण्यात आली आहे. तर, वस्त्रोद्योग आयुक्तपदी असलेल्या अविश्यांत पांडा यांची चंद्रपूर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
वर्ध्याचे जिल्हाधिकारी असलेले राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे. राज्य कर सहआयुक्त, मुंबई पदावर असलेल्या वनमथी सी. यांची बदली जिल्हाधिकारी, वर्धा या पदावर करण्यात आली आहे. तर, चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय पवार यांची राज्य कर सहआयुक्त, मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.
अण्णाभाऊ दादू चव्हाण यांची बदली पुणे विभागाच्या उपायुक्त (महसूल) या पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जीवनदाई आरोग्य योजना सोसायटी, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. गोपीचंद कदम यांची नियुक्ती सोलापूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर करण्यात आली आहे. तर विवेक जॉन्सन यांची नियुक्ती चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर करण्यात आली आहे