पिंपरी, दि.24 (पीसीबी)
पिंपळे सौदागरमधून पिंपरी गावात जाण्यासाठी पवना नदीपात्रावर बांधलेल्या जुन्या उड्डाण पुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक काही दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागर आणि पिंपरी गाव या दोन्ही परिसरांना जोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पवना नदीपात्रावर उड्डाण पूल बांधला. त्याला अनेक वर्ष होऊन गेल्यानंतर पुलाच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण झाला.
वाहनांची संख्या वाढल्याने पुलावर वाहतूक कोंडी होत होती. वाहनांची वाढती संख्या आणि जुन्या पुलावर येणारा ताण विचारात घेऊन महापालिकेने या पुलाच्या बाजूला दुसरा नवीन समांतर पूल बांधला. सध्या जुन्या पुलावरील सर्व वाहतूक नवीन पुलावर वळविण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पुलाचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या पुलाचे आयुर्मान वाढविण्यासाठी जॅकच्या साहाय्याने पुलाचा काही भाग उचलून त्याठिकाणी बेरिंग बसवण्यात येणार आहेत. या कामासाठी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती स्थापत्य प्रकल्प विभागाकडून देण्यात आली.