अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवले, प्रसूतीनंतर मुलीचा मृत्यू. दोघांवर गुन्हा

0
17

पुणे, दि.24 (पीसीबी) : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर राहण्यास भाग पाडल्याप्रकरणी दोन तरूणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरोदर राहिलेल्या या मुलीची कोल्हापूरमध्ये प्रसूती झाली. त्यानंतर, तिचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे या मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना जानेवारी २०२४ ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला.

निखील ऊर्फ मिक्या गणेश दीक्षित (रा. अप्पर, बिबवेवाडी) आणि साईदत्त ऊर्फ साहिल गोपाळ भवाळ (रा. दांडेकरपूल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मृत मुलीच्या ४२ वर्षीय आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या धुणीभांडी करून कुटुंबाची गुजराण करतात. तर, त्यांचे पती मजुरीचे काम करतात. त्यांना मृत मुलगी आणि एक मुलगा आहे. मृत्यू झालेली मुलगी १२ वी मध्ये शिक्षण घेत होती. चार-पाच महिन्यांपूर्वी तिला उलट्या होऊ लागल्या होत्या. तिच्याकडे चौकशी केली. तिची तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचे समोर आले.

त्यावेळी तिने तिचे निखील दिक्षीत याच्या सोबत प्रेम संबंध असल्याचे आणि त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे ५ महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले होते. याबाबत निखिलच्या घरच्यांना जाऊन जाब विचारू असे आई म्हणाली असता तिने निखीलच्या घरचे नकार देतील. ते स्विकारणार नाहीत. त्यांना याबददल काही सांगायला नको.’ असे ती म्हणाली होती. त्यामुळे या मुलीच्या आईने निखील आणि त्याच्या घरातील लोकांना याबददल काही सांगितले नव्हते. दरम्यान, या मुलीला साईदत्त ऊर्फ साहील याच्यासोबत याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सप्टेंबर २०२४ मध्ये या मुलीने साईदत्त याने देखील शारीरिक संबंध प्रस्थापित केले असून १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो आपल्याशी लग्न करणार असल्याचे आईला सांगितले होते.

त्यानंतर साईदत्त याने मुलीच्या आईवडिलांच्या संमतीने कोल्हापूर येथे राहायला गेले होते. त्यावेळी ही मुलगी ६ महीन्यांची गदोदर होती. त्यानंतर, २५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास साईदत्त याने फोन करून मुलीची प्रसूती झाली असून तिने मुलाला जन्म दिल्याचे सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे पती कोल्हापूरला गेले. त्यावेळी तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. साईदत्त याने तिला जवळच्या डॉक्टरांना दाखवले होते. दरम्यान, तिच्या बाळाला साईदत्तच्या नातेवाईकांकडे दिले होते. दरम्यान, तिला श्वास घेताना सतत दम लागत असल्याने कोल्हापूरमधील दवाखान्यात पुन्हा दाखवण्यात आले. तेथील उपचारांनी तिला फारसा फरक पडत नसल्याने १६ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातील बिबवेवाडीमधील एका दवाखान्यात दाखवले. डॉक्टरांनी तिच्या अंगामध्ये रक्त कमी असून तीला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर तिला १८ डिसेंबर २०२४ रोजी कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी तिला पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले.

तिचा एक्सरे रिपोर्ट पाहून तेथील डॉक्टरांनी रुग्णवाहिकेमधून ससून रुग्णालयात हलवले. ससूनमध्ये उपचार सुरू असतानाच १९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिचे निधन झाले. याविषये पोलिसांनी कुटुंबियांकडून सविस्तर माहिती घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह पोलिसांनी कुटुंबियांच्या ताब्यात दिला. तिच्यावर अंत्यविधी करण्यात आले. त्यानंतर, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.