भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवार काय म्हणाले?

0
5

पुणे, दि.23(पीसीबी)
मंत्रिमंडळाच्या विस्तारातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज आहेत. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून देखील दाखवली आहे. एवढंच नाही तर जहाँ नहीं चैना, वहा नहीं रहना, असं सूचक विधानही भुजबळांनी केलं होतं. तसेच अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुढील भूमिका घेण्यासाठी आणखी काही वेळ लागणार असल्याचं विधानही छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.

यानंतर आज छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा केली. त्यामुळे छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली? या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीसंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांनी हा आमचा पक्षांतर्गतला प्रश्न असल्याचं सांगितलं.

आज छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यावर प्रतिक्रिया काय? असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, “आमचा हा पक्षांतर्गतला प्रश्न आहे. आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू”, अशी एका वाक्यात अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी पुण्यातील विविध विकास कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना पुण्यातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं. अजित पवार म्हणाले, “मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्याचा माझा हा पहिलाच दौरा आहे. पुण्यातील सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. मागच्या सरकारच्या काळातही आम्ही अनेक कामे मार्गी लावले. पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. याबाबत १५ दिवसांत एक महत्वाची बैठक घेऊन त्यामध्ये पोलीस विभाग, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे अधिकारी अशा सर्वांना बोलवून यामधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच आज सारथी संस्थेकडे जाणार असून सारथीचे काही प्रश्न आहेत. ते प्रश्न देखील सोडवायचे आहेत”, असं अजित पवार यांनी म्हटलं.