पिंपरी,दि. २२ – “प्रत्येक क्षणाक्षणाचा विचार करणारी भारतीय कालगणना विज्ञान आधारित आहे!” असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार आणि आयुर्वेदाचार्य डॉ. अजय अपामार्जने यांनी विश्व हिंदू परिषद कार्यालय, चिंचवड येथे शनिवार, दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी केले. विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२५ या कार्यक्रमात डॉ. अजय अपामार्जने बोलत होते. विश्व हिंदू परिषद केंद्रीय सहसंघटन महामंत्री विनायक देशपांडे, क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विनायक देशपांडे यांनी, “१९७७ – ७८ पासून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा उपक्रम सुरू आहे. हिंदू समाजाला जागृत करून संघटित करणे हे विश्व हिंदू परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपले कार्य घराघरांत पोहोचते आहे. भारतात सुमारे पन्नास हजार गावांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या समित्या कार्यरत आहेत; तर भारताबाहेर तीस देशांमध्ये आपल्या समित्या आहेत. सेवा, गोरक्षण आणि धर्मांतरण प्रतिबंध या तीन प्रमुख कार्यांसाठी परिषदेच्या विविध समित्यांच्या माध्यमातून अविरतपणे काम सुरू आहे. भारतातील सहा लाख गावांमध्ये हिंदू धर्माचे कार्य पोहोचविणे, हे आपले लक्ष्य आहे. त्यासाठी दिनदर्शिका हे एक प्रभावी माध्यम आहे!” अशी माहिती दिली.
डॉ. अजय अपामार्जने पुढे म्हणाले की, “हिंदू धर्माविषयी संपूर्ण जगाला औत्सुक्य अन् कुतूहल आहे; कारण योग, आयुर्वेद, पंचांग आणि शास्त्रशुद्ध कालगणना या गोष्टी भारतीय ऋषिमुनींनी जगाला दिल्या आहेत. आपले पंचांग आणि कालगणना विज्ञानावर आधारित असल्याने ती अचूक अन् परिपूर्ण आहे. हिंदूधर्म सनातनी असून तो मानवतावादी आहे. असे असले तरी ‘मी हिंदू आहे म्हणजे कोण आहे?’ याचे सुसंगतपणे सामान्य हिंदू माणसाला मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. कीर्तनकारांना सुद्धा कीर्तन – प्रवचनातून आपला हिंदू धर्म कसा मांडावा याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसेच हिंदूधर्मातील सगळ्या आध्यात्मिक ग्रंथांचे साररूप काढून विश्व हिंदू परिषदेच्या विविध केंद्रांच्या माध्यमातून ते समाजापुढे आले पाहिजे. अधर्माशी आपला सामना आहे; परंतु संत संगमातून काय घडू शकते हे नुकतेच महाराष्ट्राने अनुभवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात की,
“धर्माचें पाळण |
करणें पाखांड खंडण |
हेंचि आम्हां करणें काम |
बीज वाढवावें नाम ||”
त्यामुळे आपण कितीही शांतताप्रिय असलो तरी शत्रूला जी भाषा समजते, त्या भाषेचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. बौद्ध, शीख, जैन या आपल्या हिंदूधर्मातील शाखांना सोबत घेऊन सगळ्या जगाला प्रेम देणारा हिंदूधर्म आहे हे बिंबवताना पंचांग, कालगणना अशा गोष्टींदेखील संपूर्ण जगात पोहोचवल्या पाहिजेत!”
श्रीपाद रामदासी यांनी सूत्रसंचालन केले. किशोर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. धनाजी शिंदे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अशोक येलमार यांनी आभार मानले. निखिल कुलकर्णी, राजाभाऊ पडसलगीकर, संजय कुलकर्णी यांनी संयोजनात परिश्रम घेतले.