ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांना इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने पहिला ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ जाहीर

0
6

पिंपरी,दि.23(पीसीबी) -नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने अवघे मराठी जनमानस आनंदले आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार कै.यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेच्या गौरवार्थ महनीय कामगिरी केली आहे. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ही त्यांचीच चिरंतन कामगिरी आहे. मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीसाठी दूरदृष्टीने अनमोल कार्य करणाऱ्या, साहित्य आणि साहित्यिकांवर प्रेम करणाऱ्या या सुसंस्कृत नेत्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी राज्यपातळीवर ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्याविषयी ठरविण्यात आले आहे.

आपल्या साहित्यनिर्मितीने धर्मनिरपेक्ष आणि एकसंघ समाजरचनेला बळकटी देणाऱ्या, मराठी भाषा, संस्कृती आणि उज्ज्वल परंपरेला साजेसे विचार प्रसृत करणाऱ्या, आपल्या वाणी आणि लेखणीने समाजप्रबोधन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अकरा हजार रुपये, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल. यावर्षीचा पहिला पुरस्कार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर आणि सचिव रामभाऊ सासवडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

साहित्य क्षेत्रात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी गौरवास्पद आहेच, त्याचबरोबर एक सत्यवादी विचारवंत आणि तत्त्ववेत्ता म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर, देशात व देशाबाहेरही मानवतेसाठी, माणुसकीसाठी, विश्वकल्याण आणि विश्वशांतीसाठी त्यांनी केलेली वैचारिक पेरणी ही निश्चितच समाजाला प्रेरणादायी आहे. म्हणूनच यावर्षीचा पहिला ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ जाहीर करताना परिषदेस विशेष आनंद वाटत आहे, असे बोऱ्हाडे आणि तापकीर यांनी म्हटले आहे. सबनीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या निवडीचे पत्र परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे, सचिव रामभाऊ सासवडे आणि सदस्य माणिक सस्ते यांनी दिले.

देहू-आळंदी या संतभूमीच्या पंचक्रोशीत आणि इंद्रायणी भोवतालच्या ग्रामीण आणि निमशहरी, विकसनशील परिसरात साहित्याची चळवळ रुजविण्यासाठी काही साहित्यप्रेमी मंडळी इंद्रायणी साहित्य परिषदेच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. मराठी भाषा व साहित्याच्या गौरवासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून मागील तीन वर्षांपासून इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन रविवार, दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी मोशी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथील जय गणेश बँक्वेट हॉल याठिकाणी संपन्न होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यिक, विचारवंत उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.