आळंदी,दि.22 (पीसीबी)
भरधाव बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. २०) रात्री दहा वाजताच्या सुमारास चाकण घाटात घडला.
ज्ञानेश्वर लक्ष्मण ईघारे (वय ३५, रा. आळंदी), निलू प्रजा मलिक (वय १९), सीलू प्रजा मलिक (वय २२) अशी जखमींची नावे आहेत. ज्ञानेश्वर यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस (एमएच १४/एचजी ५३७२) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश्वर हे आळंदी येथून चाकण येथे कंपनीत कामावर निघाले होते. केळगाव चौकात त्यांना त्यांच्या कंपनीत काम करणारे निलू आणि सीलू हे दिसले. त्यामुळे त्यांनी त्या दोघांना दुचाकीवर बसवले. तिघेजण दुचाकीवरून जात असताना आळंदी-चाकण घाटात समोरून भरधाव वेगात आलेल्या एका बसने ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर, निलू आणि सीलू हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.