दि.21 (पीसीबी) – कोण कुठला तो गुंड हाजी मस्तान आणि युसुफ पटेल की त्याच्यावर बॉलीवूड मध्ये चित्रपट निघतो परंतु या सर्व गुंडांची कॉलर पकडून ज्या माणसाने त्यांना उठाबशा काढायला लावल्या त्यांचे नाव दुर्दैवाने आपल्या मुलांना आणि तरुण पिढीला माहिती नाही. हवालदार बाप्पू लक्ष्मण लामखेडे यांचे आज जन्मशताब्दी वर्ष संपत आहे. त्यांच्या पवित्र आणि प्रेरक स्मृतीस अनंत कोटी प्रणाम!!
यांची माहिती नसेल तर जरूर वाचा “ज्यांचे नाव ऐकले की मुंबईच्या स्मगलर्सना धडकी भारत असे जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे.
ज्यांनी चौतीस वर्षांच्या आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीत त्या काळात लाखो रुपयांचा स्मगलिंगचा माल पकडला. ज्याची किंमत आज अब्जावधी रुपयात होइल.
इतिहासाच्या पानांत हरवलेले एक दुर्लक्षित सोनेरी पान जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांची आज जयंती
त्यांच्या अनेक गाजलेल्या कामगिर्यांपैकी एक म्हणजे दिनांक २०/९/१९५७ रोजी व्हिक्टोरिया डॉक मध्ये तीन चीनी खलाशांकडून जप्त केलेले तिनशे तोळे सोने कि जे त्यांनी आपल्या गुप्तांगामध्ये लपवले होते. स्मगलिंगच्या जगातील हि पहिलीच अनोखी घटना. बापून,कुठल्याही खबरीशीवाय केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणाच्या व दीर्घ अनुभवाच्या जोरावर उघडकीस आणून, अगदी सिंगापूर hongkong पर्यंतच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडून दिली होती.
६०-७० च्या दशकातील, हीच स्मगलर्स, gangsters मंडळी ज्यांचे नाव ऐकताच थरकापत असत, तो योद्धा म्हणजेच जमादार बापू लक्ष्मण लामखडे. १९६०/७० चे दशक म्हणजे मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्ण काळ होता तो. ह्या काळात दारू, मटका, स्मगलींग सारख्या अवैध धंद्यातून अनेक गुन्हेगार सम्राटांचा उदय झाला. व त्यांनी मुंबईला वेठीस धरले होते. असे ह्या प्रत्येक सिनेमातून दाखवले आहे. परंतु हे सर्व खरे आहे काय? तर नाही. सत्य हे आहे की, आपल्या अतुलनिय धाडसाने ह्या सगळ्या भाई मंडळींच्या छातीत धडकी भरवणारा एक आवाज मुंबई कस्टम्स मधून निनादात होता, तो म्हणजे जमादार बापू लक्ष्मण लामखडे.
सध्या बोल्लीवूड मध्ये gangsters, स्मगलर्स या मंडळींवर सिनेमे बनविण्याची जणू लाट आली आहे. हि लाट तशी ह्या इंडस्ट्रीला नवीन नाही. बिच्चारे… ते तरी कुठून आणणार रोज-रोज नवीन-नवीन ‘स्टोर्या’. मग जेव्हा-जेव्हा बोल्लीवूड मध्ये नवीन कथानकांचा दुष्काळ असतो त्या-त्या वेळेस हि प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक मंडळी बिनदिक्कतपणे १९६०/७० च्या मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा धांडोळा घेतात व कुणीतरी एखादा भाई किंवा स्मगलर शोधून काढतात. बस्स. सिनेमा तय्यार.
दिनांक २ जुलै १९२२ रोजी महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यातील, मंगळूर-पारगाव या खेडेगावात बापूचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. बापू लहान असतानाच प्लेग च्या साथीमुळे पित्याचे छत्र हरपले. मोठा भाऊ चिमाजी मुंबईच्या गोदीमध्ये अत्यंत कष्टाचे काम करीत होता. इकडे बापू आईच्या करड्या शिस्तीत लहानाचा मोठा होत होता. आई बरोबर रानात शेळया चारता चारता, रांगड्या निसर्गाच्या कुशीत, दर्याखोऱ्यातून, उन, वारा, पाऊस झेलत बापू दिसामाजी मोठा होत होता. ह्याच रांगड्या निसर्गाने, शेळीच्या दुधान व आईच्या करड्या शिस्तीने बापूला अशी काही शरीर संपदा बहाल केली की, पुढील आयुष्यातील दैदीप्यमान कामगिरीसाठी नियतीच जणू बापूला घडवित होती.
यथावकाश आपल्या कुटुंबाला हातभार लावायासाठी, बापूने देखील मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन, मुंबईच्या गोदीची वाट धरली, तीन-चार वर्षे छोटी मोठी काबाड कष्टाची कामे करून, १९४४ साली वयाच्या २२ व्या वर्षी बापूने मुंबई कस्टम्स मध्ये, शिपायाच्या पदावर भरती होऊन, कस्टम्सच्या सेवेत प्रवेश केला. आणि इथूनच बापूच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
आपली बलदंड शरीरयष्टी, धाडसी स्वभाव, कुशाग्र बुद्धी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या गुप्त हेराच्या अंगी असणारी सर्व कौशल्ये नियतीने जणू बापूला बहाल करून टाकली होती. बापूला जेव्हा १९६४ साली त्यांचा पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तो कस्टममधील पहिलाच पुरस्कार होता, व दुसर्यांदा जेव्हा त्यांना १९७८ साली मरणोत्तर राष्ट्रपती पुरस्कार घोषित करण्यात आला. तेव्हा पुरस्कारासोबत भारतीय कस्टम्स ने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सरकारी पुस्तीकेमध्ये चक्क बापूला सहावे इंद्रीय असल्याची नोंद करण्यात आली आहे. इतके अजब असे हे रसायन होते. अन जोडीला होते रामसिंग, गाडेकर, गावडे, मेहेंदळे सारखे जीवाला जीव देणारे सहकारी व अधिकारी वर्ग व तसेच त्यांचे स्वतःचे खबर्यांचे एक अप्रतिम जाळे. त्रेच्याळीस वर्षे जीवापाड जपलेली एक सायकल, सतत प्रोत्साहन देणारे कलेक्टर मुगवे, सोनावणे, कमर काझी यांच्या सारखे उच्च पदस्थ अधिकारी. या सर्वांच्या सहकार्यामुळेच बापू हि असामान्य कामगिरी करू शकले.
अशा अनेक असामान्य कामगिऱ्या बापून सतत आपला जीव धोक्यात घालून, बहुतांश एक हाती, एकट्याने पार पडल्या होत्या. अस खुद्द भारतीय कस्टम्स खात्याने नोंदवित बापूला गौरविलय. त्यांच्या प्रत्येक कामगिरीवर एक सिनेमा होईल अस हे व्यक्तिमत्व. दिनांक ४ डिसेंबर १९७८ रोजी अचानक मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या दुःखद निधनानंतर मुंबई कस्टम्स ची मुख्य कचेरी ज्या चौकात आहे, त्या चौकाचे, केंद्रीय मंत्री मगनभाई बारोट यांच्या हस्ते ‘जमादार बापू लक्ष्मण चौक’ असे नामकरण करण्यात आलेय. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या एस. एम. जोशी व इतर मातब्बर नेत्यांनी व त्यांच्या चाहत्यांनी पुढाकार घेऊन, त्यांच्या जन्म गावी त्यांचा ब्रोन्झचा पुतळा उभारण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावलीय.
आपल्या चौतीस वर्षाच्या कस्टममधील सेवेत हवालदार बापू लामखडे यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील सर्व गँगस्टर्स स्मगलर्सना सळो की पळो करून सोडले होते. हाजी मस्तान मिर्झा, युसूफ पटेल, वरदराजन्, ढोलकीया बंधू यांचे मुंबईतील स्मगलिंगचे सर्व अड्डे शोधून काढले होते. या सर्व गँगच्या प्रत्येक माणसाला बापू ओळखत होते… नव्हे नव्हे अनेकांनी बापूच्या काठीचा प्रसादही खाल्ला होता, बापूसमोर उठाबशा काढल्या होता. बापूच्या मगरमिठीतून कोणीही सहसलामत सुटला नव्हता. जेथे दिवसा जायला भिती वाटायची तेथे हवालदार बापू लामखडे रात्री – अपरात्री सायकलवर एकटेच हातात फक्त काठी – आणि बॅटरी घेऊन घुसायचे. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक स्मगलिंग गँग कार्यरत होऊन त्यांनी संपूर्ण देशात हैदोस घातला होता. या बेकायदेशीर व्यवसायातून जन्माला आलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचे मुबई हे प्रमुख केंद्र होते. घड्याळे, सोने, हिरे, कपडे अशा किंमती वस्तूची मोठ्या प्रमाणात स्मगलिंग होत असे.
अनेक पोलीस आणि कस्टम अधिकारी विकले जाऊन देशप्रेमाशी हरामखोरी करत असल्याचे हवालदार बापू लामखडे यांचे लक्षात आले होते. या सर्वाची प्रचंड चिड आली की बापूचा चेहरा लालबुंद व्हायचा, हातावर भली मोठी तंबाखू घेऊन बापू ती दोन्ही हातांच्या तळव्याने रगडून चोळून आपल्या जीभेखाली सरकवून द्यायचा आणि चडफडत स्वत:शीच काही तरी अनेक पोलीस आणि कस्टम अधिकारी विकले जाऊन देशप्रेमाशी हरामखोरी करत असल्याचे हवालदार बापू लामखडे यांचे लक्षात आले होते. या सर्वाची प्रचंड चिड आली की बापूचा चेहरा लालबुंद व्हायचा, हातावर भली मोठी तंबाखू घेऊन बापू ती दोन्ही हातांच्या तळव्याने रगडून चोळून आपल्या जीभेखाली सरकवून द्यायचा आणि चडफडत स्वत:शीच काही तरी पुटपुटायचा. यातूनच पुढे हवालदार बापू लामखडे यांचा परिचय ‘भटक्या प्रमोद नवलकर’ ( पुढे सांस्कृतिक मंत्री झालेले शिवसेना उपनेते) यांच्याशी झाला. कै. प्रमोद नवलकर यांचे ‘भटक्याची भ्रमंती’ हे सदर तेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते. अनेक वर्षे हा ‘भटक्या’ मुंबईतील स्मगलर्स आणि त्यांच्याशी संगनमत असणारे सरकारी अधिकारी यांचेशी आपल्या लेखणीने एकांगी लढत होता. आता या भटक्याच्या भ्रमंतीमागे दोन शक्ती होत्या.. एक निस्पृह आसिस्टंट कमिशनर तावडे साहेब आणि दुसरी हवालदार बापू लामखडेंचा पहाडासारखा आधार. मुंबई शहरातील स्मगलर्सच्या अशा कितीतरी अड्ड्यांची आणि चेहऱ्यांची ओळख बापूने या भ्रमंतीकाराला करून दिली होती.
एके दिवशी रात्री एक वाजता ससून डॉकच्या पाठीमागे हा ‘भटक्या’ लपून बसला असता दोन टॅक्सी गेटजवळ येऊन थांबल्या आणि काही संशयास्पद माणसे खाली उतरली. पाठीमागे समुद्र आणि बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाल्याने भटक्याच्या अंगाला थंडीतही दरदरून घाम फुटला होता. परंतु घडले ते अगदी विपरीत… समुद्राच्या पाण्यातून नखशिखांत भिजलेले हवालदार बापू लामखडे वर आले आणि कोणीतरी अरे… मुछवाला..ऽ असे ओरडताच संशयास्पद माणसे झटक्यासरशी टॅक्सीत बसून पसार झाली. थोड्याच वेळात तावडे साहेब तिथे पोहचले आणि पाण्याखालून कापडाच्या गसड्या काढण्याचे काम सुरू झाले.
या घटनेने अवाक् झालेले भ्रमंतीकार लिहितात, ‘बापू हा कस्टममधील साधा शिपाई, पण देशाभिमानाने असा पेटलेला माणूस आज तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. बापू म्हणजे स्मगलर्सचा कर्दनकाळ. बापूला विकत घेणारी शक्ती या जगाच्या पाठीवर आतापर्यंत जन्माला आलेली नाही.’ आपल्या जीवाची पर्वा न करता हवालदार बापू लक्ष्मण लामखडे यांनी एकहाती या गुन्हेगार टोळ्यांना कायद्याचा असा काही वचक आणि दरारा निर्माण केला की, साता समुद्रापार सिंगापूर, हॉगकॉग पर्यंत स्वतःचा आणि मुंबई कस्टमचा दबदबा निर्माण झाला.
हाजी मस्तानने कुली असताना एका पॅसेंजरला त्रास दिला म्हणून बापूने त्याला गचूंडी पकडून बाहेर काढले होते. मस्तान असो, वा कस्टमचा अधिकारी बापूच्या मनगटांनी कधीच कोणाचा मुलाहिजा ठेवला नाही. आपल्या वरिष्ठ अधिका-यांना सापळ्यात पकडणे सोपी गोष्ट नव्हती. रात्री किना-यावर तीस-चाळीस गुंड असले तरी हवालदार बापू डरकाळी फोडीत, काठी फिरवीत आत घुसायचा आणि प्रथम मालावर झडप घालून माल ताब्यात घ्यायचा. चिनी खलाशांकडून हवालदार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या पराक्रमाची दखल केंद्र सरकारलाही घ्यावी लागली. सन १९६४ मध्ये बापूंना प्रथम राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन १९७५ साली कस्टमने बापूंच्या कामाची दखल घेऊन ‘जमादार बापू लक्ष्मण लामखडे’ अशी पदोन्नती दिली.
बापूला कधीही गर्व झाला नाही, वेळात वेळ काढून बापू पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे, येताना आपल्या सहकार्यांना प्रसाद आणि बुक्का आवर्जून आणायचे. आपले थोरले बंधू चिमाजी यांना त्यांनी देवासमान मानले, त्यांचे उपकार बापू कधीही विसरले नाहीत. बापूंना एकदा पन्नास हजार रूपयांचे इनाम मिळाले, पण डोंगरीची खोली त्यांनी सोडली नाही कारण तिथे भाऊ चिमाजींच्या अनेक आठवणी होत्या.
सततच्या जागरणांमुळे मूळव्याधीने त्रस्त झालेले बापू ४ डिसेंबर १९७८ रोजी हॉस्पिटलमध्ये भरती झाले आणि त्यातच त्यांचे आकस्मिक निधन झाल्याची बातमी शहरभर पसरली. बापूंच्या निधनाच्या बातमीने कस्टमची कचेरी पार काळवंडून गेली होती, तर रामनाथसिंग एकटा पडला होता. भ्रमंतीकार भटक्या निराधार झाला होता रामनाथसिंग एकटा पडला होता. भ्रमंतीकार भटक्या निराधार झाला होता. दुस-या दिवशी भ्रमंतीकार बापूला श्रद्धांजली वाहताना लिहीतात – “बापू हा वाघाचा बछडा होता. एका वेळी आठ दहा जणांना लोळवण्याइतकी ताकद त्याच्या मनगटात होती. त्याच्या हातातील सोट्यात वीज होती. बापू एक निष्काम कर्मयोगी होता, हात पुढे केला असता तर लाखो रूपये त्याच्या हातात पडले असते, पण त्या मोहापासून तो अखेरपर्यंत दूर राहिला. शर्ट, हाफ पॅन्ट, आणि सायकल ही त्याची मालमत्ता त्याच्या सायकलीचा दरारा शब्दांत वर्णन करता येणार नाही. बापूबरोबरच त्या सायकलीने केलेली देशसेवा विसरता येणार नाही. युद्धात विजयी झालेल्या रणगाड्याप्रमाणे ती सायकल कस्टमने कचेरीच्या दर्शनी भागात जतन करून ठेवली तर येणारे जाणारे अभिमानाने वाकून नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्या अतुलनीय शौर्याने व पराक्रमाची शिकस्त करून जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे नाव मुंबई कस्टमच्या इतिहासात एक दंतकथा बनले.
जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांना २२ ऑक्टोबर १९८० रोजी दुस-यांदा राष्ट्रपती पुरस्कार मरणोत्तर बहाल करून सन्मानित केले.