- श्रीमन् महासाधु श्रीमोरया गोसावी महाराज यांचा ४६३वा संजीवन समाधी सोहळा
चिंचवड, दि. 19 (पीसीबी) – श्रीमन् महासाधु श्रीमोरया गोसावी महाराज यांच्या ४६३व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री मोरया गोसावी महाराज यांच्या पदांवर आधारित ‘माझ्या मोरयाचा धर्म जागो’ या भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर याठिकाणी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ऍड. देवराज डहाळे, स्वानंद मोकाशी यांच्या हस्ते गायक कलाकारांचा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला.
‘माझ्या मोरयाचा धर्म जागो’ या पदाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘तुज मागतो मी आता’, ‘मोरया तू जनक जननी; मोरया ही तुज विनवणी’, ‘माझ्या स्वामींचे भोगविलास रे; चला जाऊ पाहू मोरयास रे’, ‘माझी मयूर हीच पंढरी’, ‘मोरेश्वर गाव बरवा ठाव; तेथे नांदतो मोरया देव’, खेळिया, ‘पवनेच्या काठी संजीवन योगी; श्रीगणेशाचे भक्त मोरया गोसावी’, ‘मज सुख पावले हो’, ‘अहो थेऊर गाव तेथे देव चिंतामणी’, ‘सुखी नांदत होते मी संसारी’, ‘भीमा तटी स्थळभूमी सिद्धटेक’, ‘अजी आनंद आनंद’ या श्री मोरया गोसावी महाराजांच्या पदांनी संपूर्ण वातावरण मोरयामय झाले होते. या पदांबरोबरच ‘मल्हारवारी मोतीयाने द्यावी भरून; नाहीतर देवा जातो मी दुरून’ आणि ‘उदो ग अंबे उदो’ या गाण्यांमधून यावेळी देवीचा जागर करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सुप्रसिद्ध संगीतकार प्रसन्न बाम, सागर दहिगावकर यांनी केले होते. तर अजित विसपुते, आशिष देशमुख, राधिका अत्रे यांनी गीतगायन केले. कोरसमध्ये नयना अंजनकर, तन्मय मोमीनकर, विजय खापेकर, जयवंत राजपुरे यांनी साथसंगत केली. तर बारसी वादन निलेश देशपांडे, तबल्याची साथ जयंत क्षीरसागर व अमित कुंटे, की-बोर्डची साथ मिहीर भडकमकर, विनीत तिकोणकर यांनी पखवाज व ढोलकीची साथ तर टाळ वाद्याची साथ अपूर्व द्रविड यांनी केली. तर या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी निरुपणकार राधिका अडीवरकर यांनी पार पाडली.