खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांना अटक

0
31

दिघी, दि. १५ (पीसीबी)
सोसायटी मध्ये सफाईचे कंत्राटी काम करायचे असेल तर वर्षाला एक लाख ८० हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी करत जबरदस्तीने पाच हजार रुपये खंडणी गुगल पे वर घेतली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

चिन्ना व्यंकटेश्वरा राव वेराय्या गुंजा (वय ३२, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश सत्यवान तापकीर (वय २८), प्रद्युम्न हिरामण पानसरे (वय २६, दोघे रा. चऱ्होली बुद्रुक) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सफाईची कंत्राटी कामे घेतात. त्यांनी चऱ्होली येथील प्राईड वर्ल्ड सिटी मधील सफाईचे काम घेतले आहे. हे काम करायचे असेल तर आम्हाला प्रत्येक महिन्याला १५ हजार प्रमाणे वर्षाचे एक लाख ८० हजार रुपये खंडणी देण्याची मागणी आरोपींनी केली. तसेच फिर्यादी यांच्याकडून गुगल पेवर पाच हजार रुपये खंडणी आरोपींनी त्यांच्या गुगल पेवर ट्रान्सफर करून घेतली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.