टोईंग व्हॅन अडवून दोन दुचाकी चालकांची अरेरावी
चिंचवड, दि. १५ (पीसीबी)
वाहतूक पोलिसांनी दुचाकी टो केली असता दोन दुचाकी चालकांनी वाहतूक पोलीस महिलेला अरेरावी करत मारहाण केली. तसेच टोईंग व्हॅन अडवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना शनिवारी (दि. १४) दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड येथे घडली.
मिलिंद राजेंद्र पवार (वय ३३, रा. खडकी), एक महिला (वय २८, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुप्रिया बोऱ्हाडे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया बोऱ्हाडे या चिंचवड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. त्या शनिवारी टोईंग व्हॅनवर कर्तव्यावर होत्या. लिंक रोड वरील एल्प्रो मॉल जवळ नो पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकी टोईंग व्हॅन मध्ये भरण्याचे काम सुरु असताना आरोपी तिथे आले. पोलिसांनी आरोपींची दुचाकी देखील नो पार्किंग मध्ये पार्क केल्याने टो केली होती. त्या कारणावरून आरोपींनी पोलीस अंमलदार सुप्रिया बोऱ्हाडे यांना त्यांची गाडी सोडण्यास सांगितले. त्यावर ‘नियमानुसार दंड भरून वाहतूक विभागाच्या कार्यालयातून गाडी घेऊन जा’ असे उत्तर बोऱ्हाडे यांनी दिले. त्या कारणावरून आरोपींनी बोऱ्हाडे यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणात बोऱ्हाडे यांचा मोबाईल रस्त्यावर पडल्याने फुटला. तसेच आरोपींनी टोईंग व्हॅन अडवून गाडी सोडण्यासाठी दमदाटी केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.