पोलिसांची थकबाकी सात कोटींवर

0
37

– थकबाकीदार जनतेवर रुबाब करणाऱ्या महापालिकेने घातले शेपूट

चिंचवड, दि. 14 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने शहरात विविध ठिकाणी महानगरपालिकेकडून तब्बल २२ इमारती भाड्याने घेतल्या आहेत. त्या इमारतींच्या भाड्यापोटी पोलिस आयुक्तालयाने २००५ पासून आजअखेर १९ वर्षे झाली तरीही महापालिकेला भाडे दिलेले नाही. या इमारतींच्या भाड्यापोटी सुमारे ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये भाडे हे महापालिकेला देणे अपेक्षित आहे. परंतू, पोलीस आयुक्तालयाकडून भाडे कोणी देईना, नोटीस कोणी घेईना, त्यामुळे पोलीसांना भाडे मागणार कोण? असा प्रश्न महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पडला आहे.

सतत नियमावर बोट ठेवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिस आयुक्तालयाचा बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांलयाने महानगरपालिकेच्या तब्बल २२ इमारती, मालमत्ता शहरातील विविध भागात भाडे कराराने घेतल्या आहेत.

या इमारती पोलिस ठाणे आणि पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडून वापरल्या जात आहेत. या इमारतींच्या भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडून महानगरपालिकेला भाडे देणे अपेक्षित आहे. भाड्यापोटी पोलीस आयुक्तालयाकडून महापालिकेला तब्बल ७ कोटी ५५ लाख १२ हजार रुपये येणे आहे. हे भाडे २००५ पासून म्हणजे तब्बल १९ वर्षांपासून पोलिस खात्याकडे थकीत आहे. पुणे शहर व ग्रामीण हद्दीतील पोलीस ठाणे मिळून नव्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१८ पासून नवीन आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या महात्मा फुले शाळेच्या इमारतीत पोलीस आयुक्तालयासाठी जागा देण्यात आली. १ जानेवारी २०१९ पासून प्रेमलोक पार्क येथील नवीन इमारतीतून पोलिस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले. तत्पूर्वी शहराच्या विविध भागात पोलीस ठाण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता पोलिसांसाठी भाडेतत्वावर दिलेल्या आहेत.

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी विविध कामकाजासाठी पिंपरी महापालिकेच्या इमारती भाडेतत्वावर देण्याबाबतची मागणी केली. त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या कार्यालयासाठी चिंचवड स्टेशन येथील प्रिमिअर प्लाझा येथील दोन मजली इमारत दिली आहे.

तसेच सांगवीतील भाजी मंडईसाठी विकसित केलेले गाळे सांगवी पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी देण्यात आले. यासह पिंपरीतील लोखंडे कामगार भवन, मोहन नगर येथील बहुउद्देशीय इमारत, पिंपळे गुरव उद्यानातील क्वॉटर्स, दिघी, वडमुखवाडी येथील जागाही पोलिसांच्या वाहतूक विभाग, गुन्हे युनिट शाखा या विविध विभागासाठी भाडेतत्वावर दिल्या आहेत. यामधील बहुतांशी मालमत्तांचा महापालिका बरोबर करारनामा झाला नसल्याची बाब समोर आली आहे.

मुख्यालयासाठी निगडी येथील कै. अंकुश बोऱ्हाडे शाळेची इमारत तसेच मोकळी जागाही दिली आहे. थेरगाव पोलीस चौकीसाठी महिला विकास केंद्राची इमारत अशा २२ इमारती २००५ पासून वेळोवेळी पोलिसांसाठी महापालिकेने भाडेतत्वावर दिल्या आहेत. तेव्हापासून आजपर्यंत काही गाळ्यांचे किंवा इमारतीचे भाडेही पोलिसांना महापालिकेकडे जमा केलेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून महापालिकेला ७ कोटी ५५ लाख १२ हजार ८५२ रुपये थकबाकी येणे आहे.

कार्यालयाचे नाव थकबाकी

पोलीस आयुक्तालय इमारत २ कोटी ६० लाख ५६ हजार

दिघी पोलीस ठाणे १ कोटी ९१ लाख ३५ हजार

वाहतूक शाखा, चापेकर चौक १ कोटी ३१ लाख ७ हजार

पोलीस मुख्यालय, निगडी ६० लाख ४९ हजार

थेरगाव पोलीस चौकी ३५ लाख २३ हजार

पोलीस उपायुक्त, परिमंडळ- ३ १८ लाख ५६ हजार

सांगवी पोलीस ठाणे १० लाख ६४ हजार

गुन्हे युनिट -३, मोहननगर ८ लाख ९७ हजार