मोठी बातमी। मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख, ठिकाण ठरलं; कोणाला कोणतं मंत्रिपद?

0
22

मुंबई, दि. 14 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे नवीन सरकार स्थापन झाले. राज्याच्या महायुतीचे सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अखेर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि ठिकाण समोर आले आहे.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक बैठका पार पडताना दिसत आहेत. त्यातच काल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये सागर बंगल्यावर एक बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे आणि फडणवीसांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकडे कोणते खातं दिलं जाणार, याबद्दलची माहिती समोर आली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि कुठे होणार याबद्दलचीही अपडेट समोर आली आहे.

नागपुरात येत्या 15 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता नव्या सरकारमधील मंत्र्‍यांच्या शपथविधी पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. येत्या १६ डिसेंबरपासून सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडणार आहे. त्यापूर्वी १५ डिसेंबरला संध्याकाळी ४ वाजता मंत्र्यांचा शपथविधी होईल.

महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सागर बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखाते असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपमधील एखाद्या आमदाराला अर्थखातं देऊ शकतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास, महसूल खातं देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे हे महसूल खातं इतर कोणालाही देऊ शकतात. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती दिली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान भाजप काही वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्षसंघटनेत जबाबदारी देऊ शकतात, असे म्हटले जात आहे. गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या नेत्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार आहे, त्यांना आज दुपारनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: फोन करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.