पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज यांचे प्रवचन
पिंपरी, दि. 14 (पीसीबी) : या पृथ्वीवर भगवान प्रत्येकाला व्हायचे आहे. पण सगळ्यांकडे ती क्षमता नसते. जे तीर्थंकर होतात, ते पुन्हा जन्मास येत नाहीत. हे पद तुम्हाला कष्टाने आणि कर्मानेच मिळवावे लागते, असे प्रतिपादन श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज यांनी व्यक्त केले. भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर व श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवात तिसऱ्या दिवशी ते बोलत होते. शुक्रवारी (ता. १३) पारंपरिक पद्धतीने पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रम झाले. हा महोत्सव येत्या रविवारपर्यंत (ता. १५) चालणार आहे. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २७-अ नियोजित महापौर निवास मैदान येथे दीवाण बहादूर अण्णासाहेब लठ्ठे व्यासपीठावर हा महोत्सव होत आहे.
प्रवचानत श्री १०८ अमोघकीर्तिजी यांनी तप, दीक्षाकल्याणक तसेच पूर्व ५ कल्याणकांचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले की, जैन धर्मात सृष्टीचा उद्गाता कोणीच मानला जात नाही. ही सृष्टी अनंतकालापासून निर्माण झालेली आहे. ती भविष्यातही अनंतकालापर्यंत राहणार आहे. आत्मा अमर आहे. समाजात जे आचार विचार आहेत, ते सोन्यासारखे शुद्ध आहेत, असा जैनांचा सिद्धांत आहे. लोकांना जगण्यासाठी काय करावे लागते, समाजासाठी काय केले पाहिजे यासाठी आदिनाथ महाराज यांनी कार्य सुरू केले. कष्ट करा आणि आपली उपजिवीका सुरू करण्याची शिकवण आदिनाथ महाराज यांनी दिली. सुमेरू पर्वतावर आदिनाथ महाराजांनी माता-पित्यांचा दुग्धाभिषेक केला. त्यामुळे जैन समाजात रोज दुग्धाभिषेकाची परंपरा आहे.
श्री. १०८ अमरकीर्तिजी महाराज म्हणाले की, सध्या मनुष्य वैराग्याकडे निघाला आहे. आधुनिक तंत्रज्ञान हे माणसाचे शत्रू झाले आहेत. त्यामुळे आत्मविकासाचा ध्यास माणसाला राहिलेला नाही. माणसाच्या बुद्धीवर गंज चढत आहे. समाजाच्या ऱ्हासाच्या काळातून बाहेर पडणे गरजेचे आहे. पंच धर्म कल्याणक आयुष्याच्या विकासासाठी गरजेचे आहे.
अजित पाटील यांना समाजभूषण पुरस्कार
महोत्सवात श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील यांना समाजभूषण पुरस्काने गौरविण्यात आले. त्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. १९९२ पासून पाटील यांनी केलेले काम आणि संकटावर मात करून केलेली समाजाची सेवा त्यामुळे हा पुरस्कार सकल जैन सकल जैन समाजाच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यापूर्वी त्यांची पुणे विभागीय जैन सभेच्या महामंत्रीपदी निवड करण्यात आली.
यावेळी जैन महासंघाचे संस्थापक अशोक पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, पुणे जैन समाजाचे अचलजी जैन, पिंपरी-चिंचवड जैन समाजाचे उपाध्यक्ष सुधांशु पगारिया, अजित भांडे उपस्थित होते. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, दक्षिण भारत जैन सभा महामंत्री अजित पाटील, वीरसेवा दल सचिव अजित भेंडे, माजी महापौर संजोग वाघेरे, सकल जैन समाज पुणेचे अचल जैन, मिलिंद फडे, वीरकुमार शहा, राजेंद्र बाबर, प्रीती पाटील उपस्थित होते.
डॉ. वकीलजी पाराज (कोल्हापूर) यांचेही यावेळी भाषण झाले. ते म्हणाले, आदिनाथांपासून महावीरांपर्यंत जैन समाजापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. भगवान महावीरांनी या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. त्यातही इतरांनी त्यांनाही विरोध केला. पूर्वी समाज भरकटलेला होता. पण महावीरांनी त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. अहिंसा आणि समाजसेवा करण्यासाठी लोकांना प्रेरित केले. समग्र दृष्टीकोन अंगिकारणे गरजेचे आहे. अहंकार, आत्मपरीक्षण करून समाज घडविला.
महोत्सवातील कार्यक्रम
पंचामृत अभिषेक, नित्यपाठ, राज्याभिषेक, राजनृत्य, देवस्तुती, वैराग्य नाटिका, संगीत आरती आदी कार्यक्रम झाले. पद्मावती महिला मंडळाने हर्षिद अभिराज यांच्या आया महोत्सव या गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे नियोजन अजित पाटील, शांतिनाथ पाटील, धनंजय चिंचवडे, प्रकाश शेडबाळे, सुरगोंडा पाटील, संजय नाईक, वीरेंद्र जैन, सुदिन खोत, उमेश पाटील, विनोद वठारे, विजय भिलवडे, शरद आलासे व पार्श्व पद्मावती महिला मंडळ, वीर सेवा दल आणि जैन महिला मंडळ यांनी केले