मावळ, दि. 1३ (पीसीबी) : महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग,महावितरण तसेच पंचायत समितीच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व विभागांची आढावा बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि.11 रोजी वडगाव मावळ येथे संपन्न झाली. विभाग निहाय झालेल्या बैठकीत जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, शासकीय योजनांची अंमलबजावणी, रस्ते, स्मशानभूमी, पुल या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या कामांना निधी उपलब्ध आहे अथवा जी कामे अर्धवट अवस्थेत आहेत,त्या कामांना गती देऊन कामे पूर्ण करावीत असे आदेश आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिले.
वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे या कामास सुरुवात करण्यात यावी.कोल्हापूरी पद्धतीचे बंधारे व पुलांची कामे करून पुल वाहतुकीस खुले करावेत. जुन्या बंधाऱ्यातील पाणी गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करावेत. तलाठी व मंडल अधिकारी स्वतंत्र इमारतीची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन नवीन इमारतीत कार्यालये सुरु करावीत.
कामशेत, वडगाव फाटा, देहूरोड, सोमाटणे, लोणावळा येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठोस पावले उचलावीत असे आदेश वाहतूक विभागाला दिले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. स्थानिक हॉटेल्स व छोटे व्यावसायिक पर्यटकांवर अवलंबून असल्याने त्यांचे नुकसान होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याबाबत स्थानिक व्यावसायिक, नागरिक व पर्यटक यांना दक्षता घेण्याचे आवाहन करावे,अशा सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या.
या बैठकीस तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, गटविकास अधिकारी के.के. प्रधान, गणेशआप्पा ढोरे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,साहेबराव कारके, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.डी.थोरात, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, प्रदीप रायण्णावर, रणजीत जाधव, विजय वाघमारे, कुमार कदम, रवींद्र पाटील, तेजस्विनी कदम तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी इ.उपस्थित होते.