आळंदी, दि. 12 (पीसीबी) : बनावट कागदपत्रे बनवून सात जणांनी मिळून जमिनीचा ताबा मिळवला. यासाठी जमीन मालकाला मोबदला देण्याचे ठरवून त्यास मोबदला न देता त्यांची फसवणूक केली. ही घटना सन २००३ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत चऱ्होली खुर्द येथे घडली.
याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल दिनकर पायगुडे (रा. शिवणे), हेमंत वसंत पाटे (रा. धनकवडी), चंद्रशेखर विजयलिंग महाजन (रा. कात्रज), दामोदर कोंडीबा जगताप, संजय दामोदर जगताप आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चऱ्होली खुर्द येथे वडिलोपार्जित ३५ गुंठे जमीन होती. सन २००३ मध्ये आरोपींनी फसवण्याचा उद्देशाने त्या जमिनीचे साठेखत करून घेतले. त्यानंतर सन २००५ मध्ये २३.३४ गुंठे जमीन खरेदी करून त्याचा मोबदला दिला नाही. उर्वरित ११.६६ गुंठे जागेचे कुलमुखत्यारपत्र व विकसन करारनामा करून या करारनाम्यात डिपॉझिट २० लाख रुपये व ११ सदनिका देण्याचे कबूल केले. मात्र प्रत्यक्ष हा मोबदला न देता बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवून फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.