ग्राम ऊर्जा स्वराज राष्ट्रीय पुरस्काराबद्दल मान्याचीवाडीचे महावितरणतर्फे अभिनंदन

0
3

मुंबई, दि. 12 (पीसीबी) : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल गावाचे सरपंच रविंद्र माने यांचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले.

नवी दिल्ली येथे बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सरपंच रविंद्र माने यांनी हा पुरस्कार व एक कोटी रुपयांचा निधी स्वीकारला. देशभरातील १ लाख ९४ हजार ग्राम पंचायतींनी केंद्र सरकारच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ४५ ग्रामपंचायतींची पुरस्कारांच्या विविध वर्गवारीसाठी निवड करण्यात आली. शाश्वत विकास ध्येय (एसडीजी) स्थानिक पातळीवर गाठण्यासाठी केलेल्या कामगिरीचा पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेल्या मान्याचीवाडीमध्ये विजेची संपूर्ण गरज सौर ऊर्जेद्वारे अर्थात हरित ऊर्जेद्वारे भागवली जाते.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे गाव राज्यातील पहिले सौरग्राम आहे. गावातील घरांची तसेच ग्राम पंचायत कार्यालय, शाळा, पथदिवे, पाणी पुरवठा योजना इत्यादींची विजेची गरज गावातच सौरऊर्जा निर्मिती करून भागविली जाते. मान्याचीवाडीतील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे लोकार्पण ऑगस्ट महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

महावितरणने राज्यात शंभर गावे सौर ग्राम करण्याची मोहीम हाती घेतली असून तिचे काम चालू आहे. यामध्ये गावातील सर्व घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्या घरांना वीज पुरवठा केला जाईल. त्यासोबत गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, रस्त्यावरील दिवे, पाणी पुरवठा यासाठीचा वीजपुरवठाही सौरऊर्जेद्वारे केला जाईल.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना तीन किलोवॅट क्षमतेपर्यंत ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. यामुळे घरगुती ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविणे सुलभ होते. यामध्ये घराच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यामुळे ग्राहकांचे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळते. सौर ग्राम योजनेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसोबत अन्य सरकारी योजनांचा व उपलब्ध निधीचा कल्पकतेने वापर केला जातो.

मान्याचीवाडी पाठोपाठ पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे राज्यातील दुसरे सौरग्राम ठरले आहे. या गावातही सर्व घरांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा होतो. या गावाच्या सौर उर्जीकरण प्रकल्पाचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन पद्धतीने केले होते.

राज्यात प्रधान मंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत ७३,७९० घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यात आले आहेत. त्यांची एकत्रित क्षमता २९२ मेगावॅट असून ५९२ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.