पिंपरी, दि. 12 (पीसीबी) : समाजाची, राष्ट्राची उन्नती करण्यासाठी जन्माला येणारा जीव हा केवळ गर्भसंस्कारातूनच जन्म घेऊ शकतो, असे सांगत गर्भसंस्काराचे महत्त्व विषद करून श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज आणि श्री १०८ अमरकीर्तिजी महाराज यांनी आज प्रबोधन केले.
भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर व श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट प्राधिकरण यांच्या वतीने बुधवारी (ता. ११) पारंपरिक पद्धतीने पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या महोत्सवामध्ये ते बोलत होते. हा महोत्सव १५ तारखेपर्यंत चालणार आहे. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २७-अ नियोजित महापौर निवास मैदान येथे दीवाण बहादूर अण्णासाहेब लटके व्यासपीठावर हा महोत्सव होत आहे.
श्री १०८ अमोघकीर्तिजी महाराज म्हणाले की, गर्भावर संस्कार न केल्यास अशांत जीव जन्माला येतात. आतंकवादी, क्रूर, राष्ट्रहितविरोधी, विध्वंसक, भ्रष्टाचारी अशा प्रवृतीतचे जीव जन्मास येतात. तर, ज्या गर्भावर संस्कार झाले आहेत ते समाजाचे आणि राष्ट्राच्या हितासाठी कार्य करतात. दुसऱ्यासाठी झटत राहतात.
श्री १०८ अमरकीर्तिजी महाराज म्हणाले की, गर्भावर संस्कार न झालेल्या बालकांकडून समजात तेढ निर्माण केली जाते. ते तंटा निर्माण करणारे असतात. त्यांच्या माता पित्यांना सुद्धा अपत्याच्या वर्तनाचा त्रास होतो आणि गर्भसंस्कार झालेले बालक माता-पित्यांना अभिमान वाटेल असे कार्य करतात. गर्भसंस्कार झाल्यास मातेला सुद्धा पराक्रमी बालकाची स्वप्न पडतात. गर्भावर संस्कार केल्यानंतर भगवान तीर्थंकर यांच्यासारखे पुण्यवान मानव जन्म घेतात. ते समाजाची, राष्ट्राची उन्नती करण्यासाठी नेहमी काम करत असतात.
जैन समाजाचे महामंत्री औरंगाबादचे महावीर ठोले म्हणाले की, जैन समाज एकत्रित नसल्याने विखुरला जात आहे. सध्या समाजाचे १३ समाजगट आहेत. पण त्यात एकी नसल्याने तरूण पिढी दूर जात आहे. त्यांनी एकत्र रहायला हवे. तर समाजाला भविष्यात सत्ता निर्माण करण्याचे भाग्य मिळाले पाहिजे.
समाजाने एक होणे गरजेचे आहे, अशी भावना काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस अभय छाजेड यांनीही व्यक्त केली. यावेळी रमण कोठडिया, कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी एन देसाई, अशोक पगारिया, आनंद भारती, प्रतिष्ठाचार्य अजित पंडित, राजेंद्र जैन उपस्थित होते.
जगा आणि जगू द्या
जगा आणि दुसर्या जगू द्या,हे समाजाचे विचार असून ते विचार समाजात रुजविण्याचे प्रयत्न अशा धार्मिक कार्यक्रमाद्वारे केले जातात, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी यांनी व्यक्त व्यक्त केले.
महोत्सवात सकाळपासून झालेले कार्यक्रम
आज सकाळी मंगलवाद्य घोषाने उत्सवाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवसाच्या गर्भ कल्याणक कार्यक्रमामध्ये मिरवणूक काढण्यात आली. सौधर्म इंद्र-इंद्राणी यामध्ये सहभागी झाले होते. मंगल कलश डोक्यावर घेऊन महिलांचा मोठा सहभाग यात होता. कंकण बंधन, ध्वजारोहण, महोत्सवाच्या मंडपाचे उद्घाटन आदी कार्यक्रम पार पडले. भगवानजींना पंचामृत अभिषेक महाशांतीधारा करण्यात आले.
त्यानंतर पीठयंत्र आराधना, वास्तुविधान, महायाग मंडल आराधना, चतुर्दिक्षु होम, नवग्रह होम, अंकुररोपण करण्यात आले. मंगळवारी (ता. १०) रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेस मंदिराच्या आवारात इंद्र इंद्राणी, अष्ट कुमारीका यांचा हळदी कार्यक्रम पार पडला. या सगळ्या कार्यक्रमात श्रावक श्राविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील व सहकारी यांनी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात केली. अजित पंडीत व सहकारी यांनी विधीवत पूजा केली. बेडक्याळ येथील बेळगाव बँड पथकाने उत्कृष्ट धार्मिक गीतांचे आयोजन केले, याचा सर्व श्रावक श्राविकांनी आनंद घेतला.
संध्याकाळी पार्श्वकल्याणक महिला मंडळाचे गर्भकल्याणक नृत्य नाटिका सादर करण्यात आली. रथमिरवणूक, संगीत आरती, विश्वशांती जप्य अनुष्ठान आदी कार्यक्रम देखील झाले. कार्यक्रमाचे नियोजन अजित पाटील, शांतिनाथ पाटील, धनंजय चिंचवडे, वीरेंद्र जैन, सुदिन खोत, उमेश पाटील, विनोद वठारे, विजय भिलवडे, शरद आलासे व पार्श्व पद्मावती महिला मंडळ, वीर सेवा दल आणि जैन महिला मंडळ यांनी केले.