पिंपरी, दि. 09 (पीसीबी) : विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘ऐ हवा मेरे संग संग चल…’ या गुलाबी थंडीतील हिंदी – मराठी गुलाबी गीतांच्या नि:शुल्क मैफलीत रसिक धुंद झाले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) रविवार, दिनांक ०८ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत दिशा सोशल फाउंडेशनचे माजी कार्याध्यक्ष सचिन साठे, नरेंद्र मोहिते, मालती दामगुडे, शांताराम दामगुडे, पांडुरंग म्हस्के, प्रसन्ना वंजारी, उषा शेटे, स्मिता शेटे, अंतरा देशपांडे, राजेंद्र लढ्ढा, मंगेश सोनावणे, साहेबराव कावळे, सानिका कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे, शैलेश घावटे, अरुण सरमाने, डॉ. सायली बांबुरडे, डॉ. किशोर वराडे, नेहा दंडवते, मल्लिकार्जुन बनसोडे, सुचिता शेटे – शर्मा, विजय सहारे, स्वाती भागवत, विलास खरे, छाया अय्यर, अभिमान विटकर या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून कृष्णधवल ते सप्तरंगी चित्रपटांतील लोकप्रिय प्रणयगीतांच्या माध्यमातून रसिकांना उत्कट प्रेमाच्या वैविध्यपूर्ण भावभावनांची स्वरानुभूती दिली. “मोसम हैं आशिकाना…” , “ये दिल और उनकी…” , “आने से उसके आये बहार…” , “चेहरा हैं या चाँद खिला हैं…” , “मेरे ख्वाबों में जो आये…” , “बेकरार कर के हमे…” अशा एकल गीतांनी मैफलीत रंग भरले जात असतानाच अतिशय तन्मयतेने सादर केलेल्या “ऐ हवा मेरे संग संग चल…” या कार्यक्रमाच्या शीर्षकगीताने वन्स मोअर मिळविला. त्याचबरोबर “फूल तुम्हे भेजा हैं खतमें…” , “तेरे मेरे मिलन की ये रैना…” , “तुज संग प्रीत लगायी सजना…” , “बादल यू गरजता हैं…” , “रिमझिम के…” , “नजर के सामने…” अशा जल्लोषपूर्ण द्वंद्वगीतांनी श्रोत्यांना उल्हसित केले; तर “ये रातें ये मोसम…” या युगुलगीताच्या अप्रतिम सादरीकरणातून नीरव रात्रीचा प्रत्ययकारी भाव रसिकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. त्यानंतर “लुटे कोई मन का नगर…” , “चल कही दूर निकल जाये…” , “सावन का महिना…” , “हम तो तेरे आशिक हैं…” अशा अवीट गोडीच्या युगुलगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘गारवा’ या मराठी चित्रपटातील शीर्षकगीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला; तर “प्यार का तोहफा…” श्रोत्यांना विशेष भावला. प्रत्येक गीताचे सादरीकरण होत असताना पार्श्वभागातील पटलावर त्या संबंधित चित्रपटातील दृश्य प्रदर्शित होत असल्याने रसिकांना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळत होता. ही बहारदार मैफल कधी संपू नये असे वाटत असतानाच “तुझे देख के मेरी मधुबाला…” या दमदार गीताने समारोप करताना मैफलीतील सर्व गायक कलाकार मंचावर सामुदायिक नृत्य करीत सहभागी झाले होते.
विनायक कदम, नंदकुमार कांबळे यांनी संयोजन केले. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण केले. आकाश गाजुल यांनी छायाचित्रण केले. अरुण सरमाने यांनी निवेदन केले.