राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; बहुतांश शहरात हुडहुडी

0
20

मुंबई, दि. 09 (पीसीबी) : राज्यात सध्या कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी सुरु आहेत. राज्यातील तापमानात एका दिवसात 4 अंशांनी घट झाल्याने बहुतांश शहरात हुडहुडी भरली आहे. राज्यात आता मोठ्या विश्रांतीवर गेलेली थंडी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे आणि उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये शीतलहरींचा प्रभाव वाढल्यामुळे राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तापमान पुन्हा एकदा 10 अंशांहून कमी असल्याचं लक्षात येत आहे. तर, किनारपट्टी क्षेत्र असणाऱ्या कोकणापासून मुंबईपर्यंतसुद्धा तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. हवामानाची ही स्थिती पुढील 24 ते 48 तास कायम राहिल्यास निरभ्र आकाश आणि तापमानातील घट पाहता थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील किमान तापमान हे 20 अंशांच्या जवळपास होते. त्यामुळे उष्णता जाणवत होती. अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान 16 अंशांवर नोंदवले गेले. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वा-यांच्या झोतामुळे थंडीत वाढ होईल. रविवारपासून खान्देश, नाशिकपासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील काही दिवस थंडी राहण्याची शक्यता आहे. गेल्या आठवडाभरात बंगालच्या उपसागरावर आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील थंडी गायब झाली होती. आता फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे काही राज्यांमध्ये पाऊस तर काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे.