पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावं की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही; अभिजीत बिचुकलेंचं थेट मोदींना चॅलेंज

0
18

मुंबई, दि. 09 (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली. या पराभवातून सावरत महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन केलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 231 उमेदवार विजयी झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र मोठा फटका बसला. महाविकास आघाडीचे तीन प्रमुख घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाचं जिंकता आल्या. दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहेत. या वादात आता अभिजी बिचुकले यांनी देखील उडी घेतली आहे. ईव्हीएमवरून त्यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावं की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही, असं आव्हान बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समोर येऊन सांगावं की ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा नाही. शरद पवार साहेबांचा एवढा दारून पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही. पवार साहेबांनी यावर ठोस पाऊल उचलावं मी पवार साहेबांच्या मागे उभा आहे. शरद पवारांना ईव्हीएम विरोधात आंदोलनासाठी माझा पाठिंबा आहे. यासाठी पवार साहेबांनी धाडसी पाऊल उचलावं, मी पवार साहेबांचा पाठीराख म्हणून मागे उभा राहील असं बिचकुले यांनी म्हटलं आहे.

बारामतीमध्ये मला 200 मतं पडायला हवी होती, पण मला केवळ 92 च मते कशी मिळाली असा सवालही यावेळी अभिजित बिचुकले यांनी उपस्थित केला आहे. राज्याला खऱ्या अर्थाने स्टारडम मी दिलं, लोक माझ्यासोबत फोटो काढायला गर्दी करतात मग माझी मतं जातात कुठं, असंही यावेळी बिचकुले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी सादर करत सवाल केला आहे. काँग्रेसला 80 लाख मतं पडली पण त्यांचे 16 च आमदार निवडून आले, मात्र शिवसेना शिंदे गटाला 79 लाख काँग्रेसपेक्षा एक लाख मतं कमी पडली तरी त्यांचे 57 आमदार निवडून आले असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.