गेल्या चार निवडणुकांमध्ये मारकवाडीतून कोणाला लीड मिळालाय?

0
35

मारकडवाडी,दि. 08 (पीसीबी) : गेल्या दोन आठवड्यांपासून मारकडवाडी गाव महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आहे. मारकवाडी गावातील लोक सातत्याने बॅलेट पेपरवर निडवणुका घ्याव्यात, अशी मागणी करत आहेत. गावाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे आयोजन देखील केले होते. मात्र, हा प्रयत्न सरकारने धुडकावून लावला होता. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या गावाला भेट देत ग्रामस्थांची मत जाणून घेतली आहेत. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी देखील या गावाला भेट देणार आहेत. मारकडवाडी या गावातून ईव्हिएम (EVM) विरोधात लढा उभारला जात असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये मारकवाडीतून कोणाला लीड मिळालाय? याची आकडेवारी मांडली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही. पवार साहेब, मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल. शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय?
शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी 2014, 2019 आणि 2024 ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना 533 मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना 664 मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना 294 मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना 979 मते मिळाली.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना 956 मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना 395 मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना 1346 मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना 300 मतं मिळाली, असंही बावनकुळे यांनी म्हटलंय.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना 1021 मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना 843 मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना 1003 मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल.