जमिनीचे बक्षीस पत्र करून दे म्हणत भावाला मारहाण

0
41

तळेगाव, दि. 07 (पीसीबी) : वडिलांच्या नावावर असलेल्या २२ गुंठे जमिनीचे बक्षीस पत्र करून दे म्हणत मोठ्या भावाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी लहान भाऊ आणि त्याच्या दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. ५) रात्री नवलाख उंब्रे येथे घडली.

ज्ञानेश्वर विठ्ठल शेटे (वय ४५), अविनाश ज्ञानेश्वर शेटे (वय २८), अनिल ज्ञानेश्वर शेटे (वय २६, तिघे रा. नवलाख उंब्रे, मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तात्याभाऊ विठ्ठल शेटे (वय ४८, रा. नवलाख उंब्रे, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्याभाऊ शेटे आणि ज्ञानेश्वर शेटे हे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्या वडिलांच्या नावावर २२ गुंठे जमीन आहे. ती जमीन बक्षीस पत्र करून माझ्या नावावर करून दे, अशी ज्ञानेश्वर शेटे याची मागणी आहे. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या भांडणात ज्ञानेश्वर आणि त्याच्या दोन मुलांनी तात्याभाऊ यांना टीपॉयने तसेच हाताने मारून जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करून दमदाटी केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.