सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका; संजय राऊत याचं खळबळजनक वक्तव्य

0
56

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयावर तोफ डागली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीकडून सर्वोच्च न्यायालय आणि निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लक्ष्य करण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील दोन घटक पक्षांबाबत पक्षपात केल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक प्रकरणं मुद्दामहून रेंगाळण्यात आली अथवा वेळकाढूपणा करण्यात आल्याचा ठपका या पक्षांनी ठेवला आहे. त्यातच आज झालेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू नका असा घणाघात केल्याने खळबळ उडाली आहे. काय म्हणाले राऊत?

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील मारकडवाडी येथील गावकऱ्यांच्या धाडसाचं आणि त्यांच्या ईव्हीएमविरोधात बॅलेटवर मतदान घेण्याच्या निर्धाराचं राऊत यांनी कौतुक केले. त्यांनी नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांचे अभिनंदन केले. तर नाना पटोले, त्यांचे बंधु सुनील राऊत हे तिघे पण आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगितले. बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही मागणी या तिघांनी केली आहे. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे राऊत म्हणाले.

या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला आहे. या मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी विद्यमान आमदारांनी केली आहे. राज्यभरातून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. विरोधी पक्ष मागणी करत आहे. तरी निवडणूक आयोग डोळ्यावर झापडे घालून बसला की कानात गोळे घालून बसलेला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जनतेचा निवडून आलेला लोकांचा निकालावर विश्वास राहिलेला नाही. निवडणुका परत घ्या राजीनामा देतो असे महाविकास आघाडीचे आमदार म्हणत असल्याचे त्यांनी सांगीतले.

यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आणि कामकाजावर खरमरीत टीका केली. सर्वोच्च न्यायालयावरती फार विश्वास ठेवू नका, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. गेली साडेतीन चार वर्षे झालीत तरीही स्थानिक स्वराज्य निवडणुका झालेल्या नाही. आम्ही वारंवार निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टामध्ये याच्यासाठी लढा दिला. आता परत त्याच्यावर चर्चा सुरू केल्या आहेत. साडेतीन-चार वर्षे या राज्यांमध्ये आमच्या 14 महानगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये लोकांचं राज्य नाही. तुम्ही काय आम्हाला न्याय देताय? चर्चा कसल्या करता, निकाल द्यायचा असेल तर तो आधी द्या. लेक्चर द्यायचे असेल तर दिल्ली विद्यापीठात आणि जेएनयूमध्ये जाऊन प्राध्यापकांची नोकरी करा, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी चढवला.