मुंबई, दि. 07 (पीसीबी) : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनानं, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं योगदान दिलं. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या पिचड साहेबांनी पक्षासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची उणीव कायम जाणवेल. शोकाकूल पिचड कुटुंबियांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.