जुन्या सहकाऱ्याच्या निधनाने शरद पवार भावनिक; म्हणाले, एका चांगल्या सहकाऱ्याला…..

0
54

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचं काल रात्री निधन झालं.वयाच्या 84 व्या वर्षी मधुकर पिचड यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्हा हळहळला आहे. मधुकर पिचड यांच्या निधनाने अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली, अशा शब्दात शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. जुन्या सहकाऱ्याच्या निधनाने शरद पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी मधुकर पिचड यांनी आयुष्य वाहिलं. पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता. पण दुर्दैवाने तसं झालं नाही.राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांचं काम अतिशय उत्तम होतं, असं शरद पवार म्हणालेत. मधुकर पिचड यांनी अनेक खाती सांभाळली होती.आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केली. एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याच आम्हाला दुःख आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो हीच प्रार्थना, अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मधुकर पिचड यांच्यावर आज मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजता अकोल्यामध्ये पिचड यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी अकोलेतील पक्ष कार्यालय तसेच निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी काही वेळ ठेवणार आहेत. पिचड यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर मधुकर पिचड यांच्यावर मागच्या दीड महिन्यांपासून उपचार सुरु होते. पण काल त्यांची प्राणज्योत मालवली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे सातवेळा आमदार राहिले आहेत. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भुषवलं आहे. राज्याच्या आदिवासी विकास मंत्रिपदावर देखील त्यांनी काम केलं आहे.