मुंबई, दि. 07 (पीसीबी) : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे देवेंद्र फडणवीस सरकार येताच आक्रमक झाले आहे. आता त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा देत ते म्हणाले, आता जनतेचे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. जर पुन्हा एकदा मराठा समाज विरोधात गेला तर सत्ता चालवणे सुद्धा अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन दीड वर्षापासून सुरु आहे. परंतु मराठा समाजाला न्याय अजून मिळाला नाही. आता 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. काही महिन्यांपूर्नी मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ अंतरवाली आले होते. त्यावेळेस त्यांनी हे सगळे सांगितले होते. त्यामुळे आता 5 जानेवारीपर्यंत संधी दिली. त्यामुळे संधीचा सोने करा. अन्यथा मराठे पुन्हा आंदोलन सुरु करतील, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
राज्यातल्या गोर गरीब जनतेची जबाबदारी सरकारवर आलेली आहे. त्यामुळे ते त्यांचे कल्याण करतील. गोर गरीब लोकांना न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नचेल. उशिरा का होईना मराठा आरक्षणासाठी मार्ग काढत असतील तर त्यांचे अभिनंदन आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनाही विशेष करून सांगतो की आता तरी मराठा समाजाला असे वाटायला नको की तुम्ही समाजाचा द्वेष करता. त्यामुळे पुन्हा एकदा अंतरवालीमध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज येईल आणि हा संपूर्ण देश बघेल. मागील काही दिवसांत मला एकटा पाडून उघड पाडण्याचा प्रयत्न केला गेला. हे माझ्या समाजाला सहन होत नाही. आता असा प्रकार करु नये, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.