मुंबई, दि. 07 (पीसीबी) : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी होणार, याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीचे संकेत शनिवारी दिले. दरम्यान, महापालिका निवडणुका युता म्हणून नाही तर सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी एबीपी वाहिनीच्या मुलाखतीत स्पष्ट केले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच सह्याद्री वाहिनीला विशेष मुलाखत दिली. यात त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ‘लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळलेल्या मोठ्या यशामुळे लवकरच महापालिका निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार आहे’, असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. त्यासंदर्भात मी कालच वकिलांशी बोललो. या प्रकरणाच्या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यास त्यांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका घेतल्या जातील’.
‘ईव्हीएमवर मूर्खपणे बोलण्यापेक्षा आत्मचिंतन केले पाहिजे. झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली. महाराष्ट्रात ईव्हीएम चांगली नाही. लातूरला धीरज देशमुख हरतात तेव्हा ईव्हीएम चांगली नाही, तर अमित देशमुख जिंकल्यावर ईव्हीएम चांगली आहे. त्यामुळे ईव्हीएमवर दोषारोप करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी आत्मचिंतन केले तर त्यांना चांगल्या जागा मिळतील’, अशा शब्दांत ईव्हीएमबाबत विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिले.
‘लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा आम्हाला आणि त्यांच्या पक्षालाही झाला. विधानसभेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यामुळे त्यांनाही निवडणुका लढवाव्या लागत आहेत. विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत तीन मोठे पक्ष होते. त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या. त्यामुळे राज स्वतंत्र लढले. त्यांना या निवडणुकीत चांगली मते मिळाली’, असे फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे
निवडणुका लवकर व्हाव्यात, यासाठी प्रयत्न
या निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे, तेथे तेथे त्यांच्याशी युती करू, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.