सुषमा अंधारेंचा अजित पवार यांना टोला पवार यांच्या लोकशाही बळटीकरणाच्या लढ्याला यश

0
37

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुक्रवारी आयकर खात्याने मोठा दिलासा दिला होता. आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली होती. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येताच आयकर खात्याने या मालमत्तेवरचा ताबा सोडला आहे. त्यामुळे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आपली मालमत्ता पुन्हा मिळणार आहे. हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार आणि भाजपला टोला लगावला आहे.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आज आयकर खात्याने जप्त केलेली संपत्ती परत केली. अजित पवार यांनी लोकशाहीच्या बळटीकरणासाठी मोठ्या कष्टाने जो लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झाले आहे.हा लोकशाहीच्या बळटीकरणाचा लढा याआधी राहुल कनाल, यशवंत जाधव, रवींद्र वायकर राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता. सन्माननीय अजितदादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अजित पवार 2023 साली शरद पवार यांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अजित पवार गटाने थोडाही अवधी न दवडता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर 5 सप्टेंबरला आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी पार पडला होता. या सोहळ्यात अजित पवार यांनी सहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

नेमकं प्रकरण काय?
आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये छापा टाकून अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितपणे संबंधित असलेली अंदाजे 1,000 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये मुंबईतील उच्चभ्रू परिसर असलेल्या नरिमन पॉईंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांचा समावेश होता. याशिवाय, एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात होते. या कारवाईनंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना आपण आयकरासंबंधी सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता. आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर, दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने अजित पवारांना मोठा दिलासा देत आयकर विभागाला जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेशही दिले होते.

सन्माननीय अजित दादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार.