प्रेम प्रकरणाच्‍या संशयावरून तरुणाचा खून

0
42

अल्‍पवयीन मुलासह दोघेजण ताब्‍यात; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्‍याच्‍या संशयातून एका तरुणाचा धारदार शस्‍त्राने वार करून खून करण्‍यात आला. ही घटना गुरुवारी (दि. ५) सायंकाळी पावणे सात वाजताच्‍या सुमारास चर्‍होली येथे घडली. अवघ्‍या १२ तासांच्‍या आता पोलिसांच्‍या खंडणी विरोधी पथकाने एका आरोपीला अटक केले असून एका अल्‍पवयीन मुलास ताब्‍यात घेतले आहे.

सचिनकुमार लखीदर राय (वय २३, रा. काळेवाडी चऱ्होली. मूळ रा. बंगरी, जि. मुझफ्फरपुर, बिहार) असे खून झालेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव आहे. गौतम रामानंद राय (वय २२, रा. तेजस रेसीडन्सी, मंगलनगर, वाकड. मूळगाव मु. बंगरी पो. मरवन ता. काटी जि. मुजफ्फरपूर, राज्य-बिहार) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अल्‍पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्‍हाण यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चर्‍होली येथे सचिनकुमार राय याचा खून झाल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार खंडणी विरोधी पथक घटनास्‍थळी दाखल झाले. त्‍यांनी आसपासचे सीसीटीव्‍ही तपासले असता त्‍यावरून आरोपी गौतम राय याचे नाव निष्‍पन्‍न केले. पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या माहितीवरून आणि सहायक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून काळाखडक, वाकड येथून पहाटे सव्‍वातीन वाजताच्‍या सुमारास आरोपीला ताब्‍यात घेतले. त्‍याने दिलेल्‍या माहितीच्‍या आधारे अल्‍पवयीन मुलालाही ताब्‍यात घेतले.

मयत सचिनकुमार राय याचे आरोपीच्या नातेवाईक महिलेशी प्रेमसंबंध असल्‍याचा संशय आरोपीला होता. या कारणावरून नातेवाईक महिलेने घरही सोडले होते. त्‍यामुळे सचिनकुमार याला धडा शिकविण्‍यासाठी त्‍याचा खून केल्‍याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. खंडणी विरोधी पथकाने आरोपीला दिघी पोलिसांच्‍या ताब्‍यात दिले आहे.

ही करवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्‍त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर, डॉ. विशाल हिरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक फौजदार सुनील कानगुडे, अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, चंद्रकांत जाधव, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, मंगेश जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील नागेश माळी यांच्‍या पथकाने केली आहे.