मुंबई, दि. 06 (पीसीबी) : गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान आता या शपथविधीवर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी कायद्याप्रमाणे शपथ घेतली, तिघांना शुभेच्छा देतो. आमच्याकडून तिघांचं अभिनंदन, पण आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली, तिघांना शुभेच्छा आहेत अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीवर दिली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, आमच्याकडून तिघांचं अभिनंदन, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करा नाटकबाजी बंद करा. मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू, समाजाला सांभाळायला शिका, जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही जनतेचं मन जिंकण्याचं काम करा.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणवीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट आहे. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की आम्ही आमच्या उपोषणाची तारीख जाहीर करू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, आता ते पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.