देवेंद्रजी देशाचे पहिले मराठी पंतप्रधान असतील, मराठी अभिनेत्याच्या शुभेच्छा चर्चेत

0
31

मुंबई, दि. 06 (पीसीबी) : महाराष्ट्र राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांचा २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल लागला. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीचा पराभव झाला. अशातच निकालानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू होती. काही तर्क-वितर्कसुद्धा लावले जात होते. अनेक बैठका झाल्या. त्यानंतर आता अखेर महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर अनेक कलाकारांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर एका मराठी अभिनेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेली पोस्टसुद्धा चर्चेत आली आहे.

मराठी अभिनेता अभिजीत केळकर कायम चर्चेत असतो. तो सामाजिक, राजकीय घडामोडींवर पोस्ट, व्हिडिओमार्फत भाष्य करतो. अशातच आता अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावरून नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

अभिजीत केळकरची पोस्ट
अभिजीत केळकरने देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करत भावना व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे. अभिजीतने देशाचं भविष्य उलगडलं आहे. अभिजीतने लिहिलंय की, ‘…आजच माझ्या मनातल्या भावना व्यक्त करतो…एक दिवस असाही येईल ज्या दिवशी, देवेन्द्रजी आपल्या देशाचे “पहिले मराठी पंतप्रधान” होतील… तथास्तु!!! … मनापासून अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा Devendra Fadnavis जी’

अभिजित प्रमाणे प्रवीण तरडे, सलील कुलकर्णी या कलाकारांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. प्रवीण तरडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिलं की, ‘हिंदूत्वाची गोष्टं जगाला पटवून देण्यासाठी देवाभाऊ आणि शिंदेसाहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.. अजितदादांना विक्रमी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन’ त्याचबरोबर सलील कुलकर्णीने देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे.