देवाभाऊ… मुख्यमंत्री अनेक अर्थाने महत्वाचे – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
178

देवाभाऊ अर्थात देवेंद्रजी फडणवीस अखेर तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. फक्त भाजपसाठीच नव्हे तर पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राची आजवरची स्थित्यंतरे पाहिली तर राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणासाठीही हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. तरूण तडफदार उमदे, अभ्यासू, धोरणी, संयमी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलाही डाग नसलेले स्वच्छ चारित्राच्या नेतृत्व पुन्हा एकदा लाभले. अनेक भविष्यकार, ज्योतिष पंडितांनी फडणवीस यांच्या पत्रिकेत योग नाहीत, गृहताऱ्यांचा अडथळा असल्याचे भाकित केले होते ते खोटे ठरले आणि देवाभाऊ पुन्हा आले. मी पुन्हा येईल…, पुन्हा येईल… असे फडणवीस म्हणत. पत्रपंडित संजय राऊत त्यावेळी थट्टा करत होते. प्रत्यक्षात प्रचंड बहुमताने फडणवीस यांनी तो शब्द खरा केला. भाजपने २०२९ मध्ये शतप्रतिशतचा नारा दिलाय. याचाच अर्थ आता पुढची किमान दहा वर्षे फडणवीसांच्याच हातात महाराष्ट्र कायम राहणार, असे म्हणायला हरकत नाही.


समाज परिवर्तनाची लढाई जिंकली –
महाराष्ट्रात आपला खुंटा बळकट करण्यासाठी भाजपने गेल्या वीस-पंचवीस वर्षांत भरपूर तडजोडी केल्या. महाजन आणि मुंडे यांनी भाजप गावखेड्यात पोहचवला. नंतरच्या काळात तोच वारसा देवाभाऊंनी मोठ्या तडफेने पुढे नेला. पवार, देशमुख, चव्हाण, पाटलांच्या राज्यात मनोहर जोशींच्या नंतर देवेंद्र फडणवीसांनी राज्य समर्थपणे सांभाळले आणि वेगळ्या उंचीवर नेले. अनेक मराठा सरदार, वतनदार बरोबर घेऊन सर्वसमावेशक राजकारण केले. खरे तर, मराठा साम्राज्यालाच देवाभाऊंनी जोरदार हादरा दिला. तोसुध्दा एकदा, दोनदा नाही तर तिसऱ्यांदा. ब्राम्हण कायम पाठिशी होताच पण, मराठा, ओबीसी, बीसी, आदिवासींची ताकद एकवटली आणि एक सामाजिक क्रांति केली, मोठे परिवर्तन घडवून आणले. राजकारणातील चाणाक्य कोण ते दाखवून दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला मोदी देशाने पाहिलेत. फडणवीस यांच्यासारखा दुसरा एक निष्ठावंत स्वयंसेवक काय करू शकतो ते पवार-ठाकरेंनाही दिसले.

शरद पवार यांनी फडणवीस यांचे वारू रोखण्यासाठी जंग जंग पछाडले. मराठा आरक्षणाचा प्रश्न चार वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांच्या काळात कधी उपस्थित झाला नाही. भाजप आणि फडणवीसांना उखडून काढण्यासाठी तोच प्रश्न तापवला. मराठा अस्मिता जागवली आणि निखारा फुलवला. लाखा लाखाचे ५५ मोर्चे अंगावर अक्षरशः सोडले. आरक्षणाच्याच मुद्यावर मनोज जरांगेंची भोकाडी कोणी उभी केली ते दुनिया जाणते. उपोषण काळातील मनोज जरांगे यांची भाषा सगळे काय ते सांगून गेली. अप्रत्यक्षपणे धनगर, आदिवासी, ओबीसींनाही उचकावून पाहिले. भाजपला जातीयवादी म्हणत म्हणत दुसरीकडे ब्राम्हण विरुध्द मराठा, मराठा विरुध्द ओबीसी, एससी, एसटी विरुध्द इतर अशा जाती झुंजवण्यासाठी पडद्यामागून कितीतरी कुरघोड्या केल्या. महाराष्ट्रात आगडोंब उसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सभा समारंभातूनही अनेकदा पेशवे म्हणूनही फडणवीस यांचा दुःस्वास केला, हिनवले. राजकीय स्वार्थासाठी अक्षरशः रान पेटवले. वादळे झेलत शांत बसून देवाभाऊंनी आपल्या कृतीतून पवार यांना चोख उत्तर दिले.
२५ वर्षे शिवसेना-भाजप युतीत जीवाभावाचे होते त्या उध्दव ठाकरेंनी २०१९ मध्ये एकत्र लढून निकालनंतर दगा फटका केला. भाजपला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांनी तिथेच डाव साधला. भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस बरोबर पाट लावला आणि कडबोळे सत्तेत आणले. अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने शिवसेना वाहवत गेली आणि शरद पवार यांच्या अक्षरशः कच्छपी लागली. लोकसभा निवडणुकित ते कडबोळे जिंकले पण विधानसभेला फडणवीसांच्या खेळीपुढे ते हारले. ईव्हीएम घोटाळा आहे नाही ते काळच सांगेल पण, देवाभाऊ बाजीगर ठरले. पवार, ठाकरे आणि काँग्रेसचे अक्षरशः पानीपत झाले. कंबरडे मोडले म्हटले तरी चालेल. खुंटा इतका बळकट झाला की आता महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका असो की ग्रामपंचायत कमळच फुलणार. एकनाथ शिंदे यांनी किती ताल केला तरी त्यांचे चालणार नाही. अजित पवार यांनी काळाची पावले ओळखून लोटांगण घातले आणि फडणवीस यांना शरणागत झाले. संविधान किंवा मराठा, ओबीसी आरक्षण हे प्रचारकी मुद्देसुध्दा निकाली झाले. आता देवाभाऊंची पुढची वाट एकदम साफ आहे. महाराष्ट्रातलो हे परिवर्तन अर्थकारणाला उभारी देणारे आहे. सट्टा बाजाराने उसळी घेतली कारण केंद्र आणि राज्य हातात हात घालून विनाअडथळा निर्णय करतील. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आणि त्याचे चालक आता फडणवीस आहेत. देवाभाऊंना खूप शुभेच्छा !!!