महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना महागाईचा मोठा झटका…; तेलाचे दरही गगनाला, शेवग्याला मटणाचा भाव

0
10

मुंबई, दि. 04 (पीसीबी) : सप्टेंबरनंतर राज्यातच नाही तर देशात महागाईने पुन्हा डोकं वर काढलं आहे. भाजपाल्यासह खाद्यतेल, दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईसह राज्यातील अनेक शहरात दर वाढले आहेत. कांद्याचा थोडा बहूत दिलासा मिळत नाही तोच लसणाने गृहिणींच्या नाके नऊ आणले आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने घरचे बजेट सांभाळताना लाडक्या बहि‍णींना मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्व महागाईत संसाराचा गाडा कसा हाकायचा असा सवाल लाडक्या बहिणी सरकारला विचारत आहेत.

हिवाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नवी मुंबईतील APMC भाजी मार्केटमध्ये हिवाळा सुरू असल्याने पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतींमध्ये 30% घट झाली आहे सध्या पालेभाज्या प्रति 10 रुपये दराने विकल्या जात आहे. मागील तुलनेत हा दर खूपच कमी आहे.

नवी मुबंईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले. एपीएमसी बाजारपेठेत सध्या लसणाचे दर 300 ते 350 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झालेली आहे. व्यापार्‍यांच्या म्हणण्यांनुसार, सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढले आहेत.

खाद्यतेलाने आणले जेरीस

तेलाच्या दरवाढीमुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गणपती उत्सवापासून आतापर्यंत तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत. सध्या मार्केटमध्ये सूर्यफूल तेलाचा 15 किलोचा भाव 2280 रुपये, पाम तेलाचा 2180 रुपये, तर सोयाबीन तेलाचा भाव 2050 रुपये आहे. व्यापार्‍यांच्या मते पाम तेलाच्या दरात तब्बल 300 रूपयांची वाढ झाली असून, सूर्यफूल तेलावर 25% आयात शुल्क लावल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या तरी सोयाबीन तेलाचे भाव कमी आहे.

शेवगा 500 रुपयांवर

जालना जिल्ह्यात मागील 8 दिवसापासून थंडीचा जोर कायम असल्याने त्याचाच परिणाम आता थेट भाजीपाल्याच्या दरामध्ये झाल्याचं दिसून येत आहे. जालन्यात शेवग्याचा दर पाचशे ते साडेपाचशे रुपये किलो झाला आहे. या दरवाढीमुळे महात्मा फुले भाजी मार्केट मधून शेवगाच गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाजारात आवक कमी असल्याने शेवग्याचे दर वाढले आहेत. पुढील एक ते दीड महिना हे भाव स्थिर राहणार असल्याच विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रचंड दर वाढल्याने नागरिकांनी देखील शेवगा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. .मागील 5 ते 6 दिवसांपासून ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात तुरळक ठिकाणी शेवगा दिसून येत आहे. .दरम्यान जालन्यात पहिल्यांदाच शेवग्याला विक्रमी 500 ते साडेपाचशे रुपयांचा भाव मिळत असल्याने आजवर दरामध्ये झालेली सर्वात मोठी वाढ आहे.