महाराष्ट्रात भाजपा विजयी होताच मराठी माणसांवर हल्ल्याला सुरुवात; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

0
14

मुंबई, दि. 04 (पीसीबी) : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांनी महायुतीला चिमटा काढला. प्रचंड बहुमत मिळवून सुद्धा महायुतीला सत्ता स्थापन करण्यास वेळ लागत असल्याबाबत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. त्यांनी राज्यात सुरू असलेल्या नाराजी नाट्याला दिल्लीचे बळ असल्याचा आरोप केला. तर राज्यात भाजपा विजयी झाल्यापासून मुंबईत मराठी माणसांवर हल्ले वाढल्याचा आरोप केला. मराठी माणसांना गुजराती, मारवाडी बोलण्यास सांगण्यात येत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी राज्यातील घडामोडींवरून भाजपावर घणाघात केला.

महाराष्ट्रात सरकार स्थापन करणे हा खेळखंडोबा होऊन बसल्याची टीका राऊत यांनी केली. इतकं प्रचंड बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं आहे, मात्र मुख्यमंत्री पदासाठी काटे की टक्कर सुरू आहे. बहुमत मिळून भाजप वेळेवर सरकार स्थापन करू शकत नाही. अंतर्गत कुरघोडीमुळे भाजपला हे कठीण जात आहे तर सरकार चालवताना काय होईल, असा निशाणा त्यांनी यावेळी भाजपावर साधला.

भाजपाचा विजय झाल्यापासून मराठी माणसांवर हल्ले सुरू झाले आहेत. मराठी बोलू नका, मारवाडी गुजराती बोला अशा धमक्या देत आहेत. मराठी माणसाला उचलून आणण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याआजूबाजूचे उपरे अशा धमक्या देत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. राज्यात सुरु असलेल हे चित्र अत्यंत गंभीर आहे. मुंबई मराठी माणसांच्या रक्तातून तयार झाली आहे. आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी लढत आहोत. मराठी खपवून घेतल जात नाही अशा धमक्या दिल्या जात आहेत. राज्याची कशी लूट होईल याचा ट्रेलर आम्ही ८ दिवसांपासून पाहत आहोत, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांनी महायुतीच्या आझाद मैदानावरील शपथविधी सोहळ्यावर पण चिमटा काढला. हा राज्याचा ग्रँड सोहळा आहे. परदेशातून कोणी बोलवत आहेत का हे पाहावं लागेल, असा मिष्कील टोला त्यांनी हाणला. ते जिंकले आहेत, त्यांचा आनंद त्यांना साजरा करु द्या, असा चिमटा राऊतांनी यावेळी काढला.

या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कामगिरी बजावता आली नाही. त्याबद्दल त्यांनी मतं व्यक्त केले. महाविकास आघाडीला दोष देण्याचा प्रश्न येत नाही. आमच्यात काही चुका झाल्या असतील पण आमचा निवडणुकीत एकोपा होता. निवडणुका का हरलो हे आता हळू हळू समोर येत आहे. महिला खासदारांनी केलेली तक्रार हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. आम्ही का हरलो हे येत्या काळात समजेल. यावर काँग्रेसकडून अधिकृत कोण काही बोललं नाही, बोलल्यावर बघू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.