स्वामी गोविंददेव गिरिजी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ‘सनातन आश्रमा’त हृद्य भेट !

0
19

भारताला जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचवण्यात ‘सनातन आश्रमा’चे योगदान सर्वांत मोठे असेल !* – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी

गोवा, दि. 03 (पीसीबी) : सनातन संस्थेच्या आश्रमात येऊन, या पुण्यभूमीत उपस्थित राहून त्याचे पूर्णपणे अवलोकन केल्यावर मला अत्यंत आनंद झाला. केवळ गोवाच नाही, तर आजूबाजूच्या प्रदेशांनाही ‘तपोभूमी’ बनवण्यात ‘सनातन आश्रमा’चे मोठे योगदान आहे. या आश्रमातील उर्जेमुळे लोकांच्या मनोभूमिकेत गेल्या २५ वर्षांमध्ये जे बदल झाले आहेत, ते आपण अनुभवत आहोत. आता ही ऊर्जा अधिक वेगाने कार्य करत आहे, हेही जाणवते. म्हणूनच मला विश्वास आहे की, येत्या काही काळात आपला भारत देश संपूर्ण जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि या कार्यात या ‘सनातन आश्रमा’चे सर्वांत मोठे योगदान असेल, असे गौरवोद्गार ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला भेट दिल्यावर काढले.

या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी यांची सनातन आश्रमात हृद्य भावभेट झाली. सनातन आश्रमाच्या भेटीनंतर बोलतांना प.पू. स्वामीजी पुढे म्हणाले की, आपण भारताला पूर्वीसारखे महान राष्ट्र बनवू इच्छितो; मात्र भारत विश्वगुरूच्या स्थानावर सहज पोहोचणार नाही. यासाठी कुठेतरी उर्जेचा प्रवाह आवश्यक आहे. जसे मुंबईच्या भाभा अणुऊर्जा केंद्रातून ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपण सर्वत्र वापरतो, तसेच हा ‘सनातन आश्रम’ आध्यात्मिक ऊर्जा निर्माण करत आहे. ही ऊर्जा आसमंतात पसरून लोकांच्या मनोभूमिका प्रभावित करत हिंदू राष्ट्राच्या निर्माणासाठी कार्य करत आहे.

जसे विविध महात्म्यांनी विविध ठिकाणी तपश्चर्या केली आहे, त्याचा प्रभाव वेळोवेळी धर्माला जागृत करून तो भारताला विश्वकल्याणासाठी समर्थ बनवतो. तसेच या राष्ट्राला सामर्थ्य देणार्‍या उर्जेचा केंद्रबिंदू हा सनातन आश्रम आहे. या केंद्राला मी अत्यंत आदरपूर्वक नमन करतो. या उर्जेच्या मूळ प्रवाह पूजनीय डॉ. जयंत आठवले यांच्या दर्शनातून आला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मला अत्यंत आनंदित आणि प्रभावित केले आहे. मी त्यांना सुद्धा अत्यंत श्रद्धेने वंदन करतो. मी सर्वांना गीता शिकवतो. ती गीता सनातन आश्रमात आचरणात आणली जाते, असे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नियोजन कौशल्य हे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ (सूक्ष्म-व्यवस्थापन) होते, तसेच सनातन आश्रमाचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ शिकण्यासारखे आहे, असेही स्वामीजी म्हणाले.