आमचं मतदान कुठं गेलंय ती मतदान आम्ही हुडाकतुय….; मारकडवाडीतील ग्रामस्थ प्रशासनावर संतापले

0
25

माळशिरस, दि. 03 (पीसीबी) : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील नागरिकांनी आज पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया राबवण्याचं ठरवलं आहे. मारकडवाडी गावात आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या समर्थकांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने विरोध केला आहे. मारकडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तरिही मारकडवाडी गावातील नागरिक मतदानासाठी दाखल झाले आहेत. यावेळी एका वयस्कर आजोबांनी मनातील खंत बोलून दाखवली. 20 तारखेला मतदान झालं पण आमच्या मनासारखं झालं न्हायी म्हणून आम्ही हितं बसलुया… पहिल्या पासनं मारकडवाडीचं मतदान चांगलं हुतं आण आता ह्या बारीनं चांगलं झालं न्हाय. म्हणूनच आम्ही मतदान घितुया, असं एका वयस्कर आजोबांनी म्हटलं.

पुलिसांच्या काय बापाचं भ्या हाय. आमचं मतदान हाय. आम्हाला मतदान कराचंच हाय. आम्ही पुलिसाला भितू व्हय तव्हा…. आम्हाला आडवलं. मारलं तरी मी मतदान करणार हाय. आमची चीड का, तर आमचं लीडवर गाव असताना आमचं मतदान कुठं गेलंय ती मतदान आम्ही हुडाकतुय, असंही ते म्हणाले. माझं वय 80 च्या वर झालंय. पहिल्यापासनं मतदान केलंय. इंदिरा गांधीच्या काळापासनं मतदान करतुया. आम्हाला मतदान कसं करायचं ते शिकायला 15 दिवस लागलं हुतं… आसं शिकून मतं दिल्यातीया आण आता ही आलं अन् बटान दाबलं की कुठं मतदान गेलंय ते आम्हाला काय माहितीय तव्हा, असंही या आजोबांनी म्हटलं आहे.

मारकडवाडी गावात ज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गावात आधीपासून उत्तमराव जानकर यांना मानणारा वर्ग मोठा आहे. याआधीच्या निवडणुकांमध्ये उत्तमराव जानकर यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत. मात्र यंदा पहिल्यांदाच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना जास्त मतं मिळाली. त्यामुळे मारकडवाडीच्या नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. या गावात आज पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया दहा मिनिटात सुरू होणार आहे. संविधान वाचविण्यासाठी मारकडवाडीत बॅलेट पेपरवर मतदानप्रकिया राबविणार आहेत. आमदार उत्तम जानकर यांचे कार्यकर्ते भानुदास सालगुडे पाटील म्हणाले आहेत.