अखेर एकनाथ शिंदे हे नाराजी दूर

0
24

मुंबई, दि. 03 (पीसीबी) : गृहमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. त्यातच शिंदे यांनी आपल्या दरेगावी मुक्काम केल्याने या चर्चेला अजूनच उधाण आल्याचं दिसून आल. राज्यातील विधानसभेचा निकाल लागून दहा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही महायुतीचे सरकार स्थापन झालं नाही.

महायुतीमध्ये शिंदे गटात काही खात्यांवरून नाराजी असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यानच देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी काल 2 डिसेंबर रोजी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महायुतीमधील खाते वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जातेय. गिरीश महाजन हे रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले होते.यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये खातेवाटप संदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन – एकनाथ शिंदे भेट
येत्या 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. त्यापूर्वीच खाते वाटपाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. यातच एकनाथ शिंदे यांनी मागितलेलं गृहखातं त्यांना मिळणार की नाही, याबाबतही सर्वांचं लक्ष असणार आहे. महायुती सरकारचा शपथविधी आता दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे खाते वाटप संदर्भात अजूनही चर्चा झालेली नाही.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपाकडे गृहमंत्री पदाची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. याच बैठकीत शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली होती. मात्र भाजपाने याला नकार दिल्याचं बोललं गेलं. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. ते सुरुवातीला आपल्या मूळ गावी जाऊन राहिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे आजारपणामुळे ठाण्यातील निवासस्थानी परतले होते. यातच गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर आता एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाल्याचं म्हटलं जातंय.

आज महायुतीत खातेवाटपसंदर्भात चर्चेची शक्यता
त्यामुळे आज( 3 डिसेंबर) मुंबईत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खातेवाटप बाबत चर्चा होऊ शकते. तर भाजपची विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक होणार आहे. त्यासाठी भाजपाने निरीक्षक म्हणून नेमलेले विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन या मुंबईत आज दाखल होणार आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजता विधी भावनात भाजपाच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेते पदी निवड होईल असं सांगण्यात आलय.

यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करतील. मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता आजाद मैदानावर संपन्न होईल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा , नितीन गडकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे .