कामशेत येथील अपघातात सात जण जखमी

0
28

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कंटेनर उलटला

कामशेत, दि. 02 (पीसीबी) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावर उलटला. या अपघातात चार वाहने अडकली. त्यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास कामशेत घाटात घडली.

अनिकेत संतोष शिंदे (वय 21, रा. नेरूळ, मुंबई), यज्ञेश मधुकर गोलंबे (वय 19, रा. नेरूळ, मुंबई), अनिकेत संतोष शिंदे, अंगथाई फ्रू मोग (वय 25, रा. त्रिपुरा), अनुसया प्रभाकर खांडेकर (वय 50, रा. कुसगाव, मावळ), चिंगुबाई लहु सुराणा (वय 30, रा. कामशेत), अशोक रामचंद्र गवित (रा. कोरडा, ता. नवापूर, जि. नंदुरबार) अशी जखमींची नावे आहेत.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावरून जात असलेल्या एका कंटेनर (एमएच 43/टीएल 9710) चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटले. कामशेत घाटाजवळ जय मल्हार हॉटेल जवळील वळणावर कंटेनर मुंबई लेनवर गेला आणि पलटी झाला. कंटेनर मधील मोठा लोखंडी पाईप रस्त्यावर पडला. त्यात चार वाहने अडकली.

ह्युंदाई आय 20 (एमएच 43/बीबी 7873) या कार मधील प्रवासी अनिकेत शिंदे आणि यज्ञेश गोलंबे हे जखमी झाले. एका इको गाडीचे (एमएच 14/एसएच 3265) मोठे नुकसान झाले आहे. दुचाकी (एमएच 12/केएन 7949) वरील अनिकेत शिंदे आणि अंगथाई फ्रू मोग हे जखमी झाले. तसेच पादचारी महिला अनुसया खांडेकर चिंगुबाई सुराणा या देखील जखमी झाल्या.

कंटेनर चालक अशोक गावित याच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाला. याबाबत त्याच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अशोक गावित हा देखील जखमी झाला आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.