श्रमिकांची नगरी असल्याने विविध मोर्चे, आंदोलनांमुळे कधीकाळी पिंपरी चिंचवड शहर लाल बावट्याच्या प्रभावाखाली होते. १९८६ ते १९९७ पर्यंत शहर हे काँग्रेस नेते प्रा. रामकृष्ण मोरे सरांच्या वर्चस्वाखाली होते. बारामती लोकसभा निवडणुकिच्या निमित्ताने १९९२ मध्ये अजित पवार यांचा शहरा प्रवेश झाला. पुढे पाच-सहा वर्षांत पक्षांतर्गत कुरघोडी करत प्रा. मोरे सरांचे तमाम शिष्यगण दादांनी गळाला लावले. वीस वर्षे अजितदादांनी एकहाती सत्ता गाजवली, त्यांचे निर्विवाद वर्चस्व कायम होते. अगदी २०१७ पर्यंत दादा बोले आणि शहर डोले अशीच परिस्थिती होती. सत्तेची दिशा ओळखून दादांचे कट्टर समर्थक एक एक करत फुटले आणि सरळ भाजपमध्ये सामिल झाले. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या आमदार जोडगोळीने भाजपचे नेते बनत सरळ अजितदादांचाच टांगा पलटी केला. महापालिकेतील अवघ्या तीन सदस्यांचा भाजपने उंच झेप घेतली. तब्बल ७७ भाजप सदस्य जिंकले. दादांच्या राष्ट्रवादीचे पानिपत झाले आणि संख्याबळ ८७ वरून थेट ३६ पर्यंत घसरले. २०१९ च्या मावळ लोकसभा निवडणुकित दादांचे चिरंजीव पार्थ याचा अत्यंत दारुण परभाव झाला. कर्माचा सिध्दांत असतो, कारण जे प्रा. रामकृष्ण मोरे सरांचे दादांनी केले तेच कालांतराने अजितदादांच्या वाट्याला आले. भाजपच्या आश्रयाला गेलेल्या अजितदादांच्या हातातून हे शहर कायमचे निसटले आहे. आता या शहराची ओळख अजितदादांचे शहर अशी राहिलेली नाही. तीन वेळा विजयी झालेल्या आमदारांचे मताधिक्यच सागंते की हे शहर आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकितसुध्दा महायुतीचा नव्हे तर भाजपचाच वरचष्मा कायम राहणार आहे.
रा.स्व.संघ, भाजपची यंत्रणा अशी अखंड राबली –
सहा महिन्यांपूर्वीच्या लोकसभा आणि आताच्या विधानसभा निवडणुकित भाजपला संपूर्ण शहरातून मिळालेला प्रचंड प्रतिसाद खूपच बोलका आणि पुढचा मार्ग दाखवणारा आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचा जनाधार वेगाने वाढलाय हे विरोधकांनाही मान्य करावेच लागेल. विधानसभेला १६ लाख मतदारांपैकी ९ लाख ५९ हजार ४१६ मतदारांनी मतदान केले.
पैकी महायुतीला ५ लाख ५७ हजार ७१३ मते आणि आघाडीच्या उमेदवारांना मिळून ४ लाख ९४ हजार ४६८ मते होती. दोघांमध्ये अंतर तसे अवघे ६८ हजाराचे दिसते म्हणजे जवळपास बरोबरी आहे. भाजपचे शंकर जगताप हे लाखाच्या तर महेश लांडगे हे ६५ हजारांचे भरभक्कम मताधिक्य घेऊन जिंकले. तुलनेत दादांचे खंदे समर्थक अण्णा बनसोडे हे ३५ हजाराने कसेबसे का होईना विजयी झाले. भाजप आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी जीव ओतून प्रत्येक घर अक्षरशः पिंजून काढले. आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली असताना कुठलिही वाच्यता न करता आदेशानुसार या यंत्रणेने शहरात सर्व घटकांच्या बैठका घेतल्या. अगदी जात संघटना आणि त्यांचे छोटे मोठे नेते यांना भेटून सर्व समुहांशी चर्चा केली. दुसरीकडे भाजप संघटनेने लाडकी बहिण योजना दोन लाख महिलांपर्यंत पोहचवली. हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुविकरणासाठी हिंदू जनजागृती समितीने पध्दतशीर काम केले. ३५० वर मठ, मंदिरांच्या अधिपतींना संत संमेलनातून निमंत्रीत करून संदेश पोहचवला. महिला बचत गटांना, हाऊसिंग सोसायट्यांना हवे नको ती सर्व मदत केली. सोशल मीडियातूनही काही विषय चर्चेत आणले. अगदी अचूक नियोजन आणि व्यवस्थापन होते. धक्कादायक म्हणजे महायुतीचे अन्य घटकपक्ष म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी प्रचारात वरवर होती. दगाफटका होणार हे गृहित धरून त्यांच्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या भरवशावर न राहता संघ आणि भाजपची यंत्रणा कार्यरत होती. कष्टाचे चिज झाले आणि तीनही आमदार युतीचेच जिंकले. संघ आणि भाजपने मदत केली म्हणून पिंपरी राखीव मधून दादांचे अण्णा बनसोडे जिंकले. थोडक्यात मतितार्थ असा की, यापुढेही या शहरात भाजपचेच चालणार.
भाजपच्या २०२९ च्या तयारीचा अर्थ काय –
अमित शाह यांनी म्हटल्यानुसार ‘‘२०२९ साली शत-प्रतिशत’’ भाजप आहेच. म्हणजे ना अजित पवार यांची गरज, ना एकनाथ शिंदे यांची. याचाच अर्थ देश पातळीवर अकाली दल, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, बिजू जनता दल, आसाम गण परिषद आणि अन्य काही नामशेष होत जाणाऱ्या पक्षांच्या यादीत आणखी दोन पक्षांची म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची भर पडणार. भाजपचे पुढच्या पाच वर्षांचे नियोजन असते. म्हणजेच आताची पिंपरी चिंचवड महापालिका आणि २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला शहरात शत-प्रतिशत भाजप राहणार. २०२६ मध्ये नवीन मतदारसंघ रचना होईल आणि शहरात स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ तसेच किमान ५ आणि कमाल ६ विधानसभा मतदारसंघ निर्माण होतील. भाजपचे सूत्र पाहिले तर, २०२९ ला दादा आणि शिंदेंचे पक्ष हिशेबातही नसतील. शहर न कळत भगवे झाले. हिंदुत्वाचा प्रचार, प्रसार इथे रुजलाय. म्हणूनच म्हणावे वाटते दादांची सद्दी संपलीयं. जहाज बुडायला लागले की जीव वाचवायला सगळे उंदिर उड्या मारतात. स्वतःचे अस्तित्व राहणार का, या चिंतेत शहरातील आघाडीचे नेते कार्यकर्ते आहेत. महापालिका निवडणुकिचे बिगूल वाजले की दादांच्या राष्ट्रवादीचीच मोठी फौज भाजपमध्ये सामिल झालेली दिसेल. घोडेमैदान जवळ आहे. जयश्रीराम