माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून; पोलिसांनी 12 तासाच्या आत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

0
33

शिक्रापूर, दि. 02 (पीसीबी) : शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोयाळी गावठाण (ता. शिरूर) येथील हिवरे रस्त्यावर रविवारी (ता.1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पुर्ववैमनस्यातून झाली असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अवघ्या 12 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

पप्पु नामदेव गिलबिले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर दत्तात्रय बंडूपंत गिलबिले (वय 52) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तात्रय गिलबिले यांची पत्नी रोहिनी दत्तात्रय गिलबिले ( वय 47, रा. हिवरे रोड, कोयाळी गावठाण, शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहिनी गिलबिले व पप्पु गिलबिले हे दोघे एकमेकांच्या घराजवळ राहत आहेत. सुमारे एक वर्षापुर्वी दत्तात्रय गिलबिले यांच्यावर पप्पु गिलबिले याने त्याच्या पत्नी सोबत चॅटींग केल्याच्या संशयावरून भांडणे केली होती. व त्यावरून त्यांच्याच सतत वाद होत होते. याचा पप्पु गिलबिले याच्या मनात राग होता. दरम्यान, रविवारी (ता. 1) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे घरासमोरील डिलाईट कॅफे समोर बसले होते.

दरम्यान, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर मोठा आरडा ओरडा झाला. तेव्हा रोहिनी गिलबिले यांनी बाहेर येऊन पाहिले असता, घराच्या जिन्या जवळ दत्तात्रय गिलबिले हे जखमी अवस्थेत आढळून आले. दत्तात्रय गिलबिले यांच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर धारधार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. यावेळी दत्तात्रय गिलबिले यांनी सांगितले की, पप्पु गिलबिले याने हत्याराने मारहाण केली आहे. त्यानंतर रोहिनी गिलबिले यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी दत्तात्रय गिलबिले यांना त्वरित रक्षक हॉस्पीटल येथे उपचारासाठी नेले. परंतु, दत्तात्रय गिलबिले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आयमॅक्स हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी दत्तात्रय गिलबिले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. आरोपी पप्पु गिलबिले याने त्याच्या पत्नीसोबत दत्तात्रय गिलबिले यांनी चॅटींग केल्याच्या संशयावरून ठार मारले आहे. अशी तक्रार रोहिनी गिलबिले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांचा एक पथक आरोपीच्या मागावर होते. पोलिसांच्या पथकाने आरोपी पप्पु गिलबिले याचा शोध घेऊन अवघ्या बारा तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मस्कर करीत आहेत.