महायुतीत गृहकलह कायम

0
21

– भाजपचा नकार मात्र, एकनाथ शिंदेंचा हट्ट कायम

मुंबई, दि. 02 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता येणार हे निश्चित असले तरी आधी मुख्यमंत्रीपद आणि नंतर गृहमंत्रीपदावरुन निर्माण झालेल्या तिढ्यामुळे सरकारचा शपथविधी अद्याप पार पडलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपने ही मागणी मान्य केली नव्हती. त्यामुळे दिल्लीत अमित शाह यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीनंतर मुंबईत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी सरळ साताऱ्यातील आपल्या गावचा रस्ता पकडला होता. दरे गावात त्यांचा दोन दिवस मुक्काम होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची देहबोली बदलल्याची चर्चा आहे. दिल्लीतील अमित शाह यांच्या घरी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला होता. मात्र, दरे गावातील मुक्कामानंतर एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीतील आत्मविश्वास पुन्हा दिसू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

एकनाथ शिंदे यांनी रविवारी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका ठामपणे मांडली होती. सीएम म्हणजे फक्त चीफ मिनिस्टर नव्हे, तर कॉमन मॅन. मी कॉमन मॅन व जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले. अडीच वर्षात जेवढ्या योजना राबवल्या, तेवढ्या कोणीही राबवल्या नसतील. माझ्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या. दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोबत होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकपयोगी योजना राबवल्याने व महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावल्याने जनतेने भरभरुन मते दिली, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या यशात आपलाही मोठा वाटा असल्याची गोष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्याला सत्तेतही मोठा सहभाग अपेक्षित असल्याची अपेक्षा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. एकनाथ शिंदे यांनी एकूण देहबोली पाहता आता ते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत, अशी चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदेंनी बोलवली महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी ही महत्वाची बैठक वर्षा किंवा नंदनवनला होणार असल्याची सूत्रांची माहिती. या बैठकीत मुख्यमंत्री जागावाटप त्याचबरोबर महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करतील, असे समजते. महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला 13 मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली जाणार असून मंत्रीमंडळात शिवसेनेकडून काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपच्या बैठकीबाबत अद्याप संभ्रम
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा होईल यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. अद्यापपर्यंत आमदारांना बैठक केव्हा होईल याबद्दल कुठलाही निरोप नाही. शपथविधी 5 डिसेंबरला होईल, हे निश्चित झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक 2 डिसेंबर किंवा तीन डिसेंबरला होईल अशी शक्यता होती. मात्र, अद्यापपर्यंत आमदारांना त्या संदर्भातले निरोप नसल्याने बरेचसे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होण्याची शक्यता आहे.

भाजपची विधीमंडळ पक्ष नेता निवडीची बैठक उद्या दुपारनंतर किंवा 4 डिसेंबर ला होण्याची शक्यता आहे. 5 तारखेला शपत विधी होणार असल्याने एक दिवस आधी 4 तारखेला विधीमंडळ पक्षनेता निवडला जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक आमदार मतदारसंघात आहे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पक्ष नेता बैठक ही शपथविधी ग्रहण कार्यक्रमाच्या एक दिवस आधी करण्याचा भाजपचा मानस असल्याचे समजते