काळजीवाहू मुख्यमंत्री आणि सरकार हे असंवैधानिक – असिम सरोदे

0
68

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. महायुतीने या निवडणुकीत २८८ पैकी २३५ जागांवर विजय नोंदवला तर विरोधकांच्या महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निकाल जाहीर होऊन बरेच दिवस झाले तरी सत्तास्थापना मात्र झालेली नाही. इतकेच नाही तर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यााचा पेच देखील सुटलेला नाही.

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ मात्र संपुष्टात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून ते सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी पुढील मुख्यमंत्री शपक्ष घेऊन नवे सरकार स्थापन केले जात नाही तोपर्यंत असणार आहे. यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते आणि विधिज्ञ असिम सरोदे यांनी मात्र देशाच्या राज्यघटनेत काळजीवाहू मुख्यमंत्री असे कोणतीही संकल्पना नसल्याचे म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. आसीम सरोदे यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री या संकल्पनेविषयी आपले मत व्यक्त केले आहे.

असिम सरोदे काय म्हणालेत?
सुरूवातीलाच ‘काळजीवाहू मुख्यमंत्री’ अशी कोणतीही संकल्पना संविधानात नाही, असे असिम सरोदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. पुढे ते म्हणतात की की, “विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर या ‘संविधान दिवस’ असलेल्या दिवशी संपला आहे. संविधान दिवस साजरा झाला. पण इथे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याचा कुणी दावा सुद्धा केला नाही व तरीही राज्यपालांनी ‘राष्ट्रपती राजवट’ जाहीर करण्याचा कोणताही अहवाल, सल्ला किंवा शिफारस राष्ट्रपतींकडे केलेली नाही. हे सगळे संविधानिक प्रक्रियेत बसत नाही आणि असंवैधानिक सुद्धा ठरते,आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे व अशी राष्ट्रपती राजवट सरकार स्थापन होतांना रद्द करता येते”, असेही सरोदे म्हणाले आहेत.