– मंत्रीपदसाठी लांडगे, बनसोडे, शेळके यांच्या नावाची जोरदार चर्चा
पिंपरी, दि. 29 (पीसीबी) : विधानसभा निवडणुकित तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल पिंपरी राखीव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचे खास अभिनंदन करण्यासाठी भाजप नेते माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी आकुर्डी येथील कार्यालयाला भेट दिली. दरम्यान, अजितदादांचे कट्टर समर्थक म्हणून बनसोडे यांचा राज्य मंत्रीमंडळात समावेशाची जोरदार चर्चा सुरू असल्याने पाटील यांची भेट महत्वाची समजली जाते.
श्री पाटील यांच्या भेटीबद्दल माध्यमांशी बोलताना आमदार बनसोडे म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील मला भेटायला आले होते. माझे त्यांचे सलोख्याचे संबंध कायम आहेत. मी तिसऱ्यांदा आमदार झोलो म्हणून अभिनंदन करण्यासाठी खास ते कार्यालयात आले. तशी ही त्यांची सदिच्छा भेट होती.
पिंपरी चिंचवड शहराला गेल्या ४२ वर्षापासून एकाही स्थानिक नेतृत्वाला मंत्रीपदाची संधी मिळालेली नाही. मी तिसऱ्यांदा निवडूण आलोय आणि अजितदादांचा कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्रभर ओळखला जातो. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, मला मंत्रीपद मिळायला पाहिजे. सर्व समाज बांधवांनासुध्दा हेच वाटते की, यावेळी मंत्रीपद मिळावे. माझ्याकडे तळागाळातल्या कार्यकर्त्यांची मोठी टीम, त्यांना ताकद मिळायची तर मंत्रीपद मिळायला पाहिजे.
भाजपमधून महेश लांडगेंचे नाव पुढे –
पिंपरी चिंचवड शहरात भोसरीतून महेश लांडगे आणि चिंचवडमधून शंकरशेठ जगताप असे दोन भाजपचे आमदार विजयी झालेत. जगताप हे तब्बल लाखाच्या फरकाने जिंकलेत आणि लांडगे हे ७० हजारांनी निवडूण आले. आगामी महापालिका निवडणुका विचारात घेऊन महेश लांडगे यांना किमान राज्यमंत्री पद मिळाला पाहिजे अशा मागणी सुरू आहे.
मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले भाजपचे आमदार महेश लांडगे यांना मंत्री पद मिळावे यालाठी जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि आमदार लांडगे यांचे अत्यंत निकटचे संबंध असल्याने यावेळी त्यांची वर्णी लागू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जाते आहे.
सुनील शेळके यांचेही नावी मंत्रीपदासाठी –
दरम्यान, आमदार बनसोडे यांच्याबरोबर आता मावळ तालुक्यात सर्व विरोधकांना चितपट करून लाख मतांच्या फरकाने सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले आमदार सुनील शेळके यांचेही नाव आता अजितदादांच्या गोटातून संभाव्य मंत्री म्हणून चर्चेत पुढे आले आहे.