मुंबई, दि. 29 (पीसीबी) : गेल्या काही महिन्यांपूर्वी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचं एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यात अशा घटनांवर आळा बसेल आणि आरोपींच्या मनात भीती निर्माण होईल, असं समजलं जात होतं. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. कारण, मुंबईच्याच भांडुप येथील शाळेत पुन्हा एकदा मुलींसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार घडला आहे.
मुंबईच्या भांडुपच्या येथील एका नामांकित शाळेत १०-११ वर्षांच्या ३ विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. शाळेच्या लिफ्ट मेकॅनिकने मुलींसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक माहिती आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी लिफ्ट मॅकेनिकवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
पालकांच्या दबावानंतर शाळेनेही लिफ्ट मेकॅनिकविरोधात कारवाई केल्याची माहिती आहे. या लिफ्ट मेकॅनिकने शाळेतील १० ते ११ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
ही एक नामांकित इंटरनॅशनल शाळा आहे. या शाळेत तीन मुलींसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. २७ नोव्हेंबरला ही घटना घडल्याची माहिती आहे. सकाळी १० ते दुपारी दीड या काळात मुली शाळेत होत्या. त्या योग करत होत्या. त्यादरम्यान, शाळेच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये लिफ्ट मेन्टेनंन्सचा कर्मचारी होता तो मुलींकडे गेला आणि त्यांची छेड काढली.
त्यानंतर या मुलींनी शाळेतील शिक्षकांकडे याची तक्रार केली. त्यानंतर शाळेतील सीसीटीव्ही तपासण्यात आला. तेव्हा हा लिफ्ट मेकॅनिक मुलींशी गैरवर्तणूक करताना आढळून आला. त्याने तीन मुलींसोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलं होतं. तो मुलींकडे बघून अश्लील खूणा करतानाही दिसला.
त्यानंतर शिक्षकांनी या आरोपीला पकडून ठेवलं आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी मुळचा ओदिशाचा असल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणात पुढील कारवाई सुरु असून या घटनेने पीडित मुलींना मोठा धक्का बसला आहे.










































