शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली; यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका आदिती तटकरेंचा महेंद्र थोरवेना खोचक टोला

0
4

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचवेळी महायुतीमधील खदखद बाहेर येत आहे. महायुतीच्या नेत्यांमध्ये शाब्दीक वॉर सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला आता सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नका, असा सल्ला आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना दिला आहे.

महेंद्र थोरवे काठावर वाचले आहेत‌. जरा का इकडे तिकडे झाले असते तर मग त्यांना त्यांची जागा कळली असती. असा खोचक टोला रोहेकरांच्या भेटीला आलेल्या आदिती तटकरे यांनी लगावलाय. कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर आरोप लावले होते. विजयानंतर बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले होते की, माझा पराभव करण्यासाठी अनेक अदृश्य शक्ती कार्यरत होत्या. महायुतीत असूनही त्यांनी मला पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. परंतु त्यांचा हा डाव माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी उलटवला. माझा विजय झाला आणि माझ्या मतदासंघातून सुनील तटकरे यांचा पराभव झाला.

महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी गद्दारी केली, या थोरवे यांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे यांच्या कन्या आणि श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, महेंद्र थोरवे काठावर वाचले. मी त्यांना फारसा महत्त्व देत नाही. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा. यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊ देऊ नये. यश नम्रतेने स्वीकारायचा हवे. मी 82 ते 83 हजार मताधिक्याने निवडून आली आहे. पण या यशचा स्वीकार आम्ही नम्रतेने करत आहोत.

आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, यश किती डोक्यात जाऊ द्यायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे. राज्यात आता महायुतीचे सरकार येत आहे. आमच्या पक्षातून कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवणार आहे. स्थानिक आमदार हे ठरवत नाही.