मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे होमहवन शिवसेनेचे विठ्ठलाला साकडे

0
3

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा अभूतपूर्व निकाल लागला आहे. महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. त्यापैकी भाजपाला १३२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता इतकं घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीसमोरचा पेच आहे तो मुख्यमंत्री म्हणून कुणाला निवडलं जाणार याचा. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांनाच संधी मिळावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी पुणे शहरातील सारसबाग गणपती मंदिरात होमहवन केले आहे तर, शिवसेनेने एकनाथ शिंदेंसाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांची भावना काय?
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं जावं ही भाजपाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. कारण २०१९ ला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार होते. मात्र शिवसेनेकडून आणि खासकरुन उद्धव ठाकरेंकडून जे राजकारण केलं गेलं त्यामुळे त्यांना सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधात बसावं लागलं. त्यानंतर २०२२ मध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तीन टर्म म्हणजेच २०१४ ला १२२ आमदार, २०१९ ला १०५ आमदार आणि २०२४ मध्ये १३२ आमदार असं घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं जावं ही भावना भाजपा कार्यकर्त्यांची आहे. दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही देवेंद्र फडणवीस यांचं नाव नक्की केल्याची माहिती आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास काही हरकत नसेल असं म्हटलं आहे.

अशी सगळी परिस्थिती असली तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी शिवसैनिकांची भावना आहे. याचं महत्त्वाचं कारण निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. लाडकी बहीण योजनाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या नावाने राबवण्यात आली. तर एकनाथ शिंदे यांनी ५७ आमदार आणि ४ पुरस्कृत आमदार अशा ६१ जागा जिंकल्या. कमी जागा लढवूनही त्यांचा स्ट्राईक रेट मोठा ठरला. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं जावं ही शिवसैनिकांची भावना आहे. शिवसैनिकांनी त्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घातलं आहे.

काय म्हटलं आहे शिवसैनिकांनी?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची निवड व्हावी ही आमची मागणी आहे. त्यासाठी महाराष्ट्राचं अराध्य दैवत विठ्ठल रखुमाई यांना पंचामृताचा अभिषेक केला आहे. आम्ही विठ्ठलाला साकडं घातलं आहे की महायुतीने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवली आहे. त्यांचा चेहरा होता त्यामुळेच भरघोस मतदान झालं आहे ही जनभावना आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद द्यावं अशी मागणी आहे. तर पुण्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून देव पाण्यात ठेवण्यात आले आहेत.

पुण्यात देवेंद्र फडणवीसांसाठी देव पाण्यात
भाजपा पुणे शहराच्या वतीने सारसबागेतील सिद्धिविनायकाला साकडं घालण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याची ही मनापासून इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. या राज्याच्या जनतेच्या कल्याणासाठी, शेतकरी बांधव, दलित, उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भाजपाची भावना आहे असं धीरज घाटे यांनी स्पष्ट केलं.