मुंबई, दि. 27 (पीसीबी) : भाजपाने शिंदेंना केंद्रीय गृहमंत्रीपदाची ऑफर दिली असेल. भविष्यात पंतप्रधानपदाचं आश्वासन दिलं असेल. महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बनेल यात माझ्या मनात शंका नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते, त्यावर आता शिंदे गटाच्या नेत्यानेच पलटवार करत प्रत्युत्तर दिलं आहे. कोणाला पंतप्रधान, मुख्यमंत्री बनवावं हा आमचा विषय आहे, विरोधकांकडे रडत बसण्याशिवाय दुसरं काम नाही असा पलटवार संजय शिरसाट यांनी केला आहे. कसं झालं, क्या से क्या हो गया, असे सगळे डायलॉग आता ते पाठ करत बसतील. करावं तसं भरावं हे आता विरोधकांच्या नशिबी आलंय. आधी बेकायदेशीर सरकार बनवत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार याची आमच्यापेक्षा त्यांनाच जास्त चिंता लागली आहे.
आम्हाला आमचं सरकार कधी स्थापन करायचं, ते कसं चालवायचं हे आम्ही ठरवू, तुम्ही आता फक्त घोषणा देण्याचं काम करा, असा खोचक सल्लाही संजय शिरसाट यांनी दिला. 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन होणार होतं, पण आता ती तारीख उलटून गेली आहे तरीही सरकार स्थापना झालेली नाही. त्यांच्या तंगड्यात तंगड्या अडकल्या आहेत, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली होती. मात्र ते आरोप संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे फेटाळले आहेत. असं काहीही नाही, आमच्या कुठेही तंगड्यात तंगड्या अडकलेल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार किंव एकनाथ शिंदे, सर्व नेते निवांत आहेत. सरकार व्यवस्थितपणे स्थापन होईल, तुम्हाला 2-4 दिवसांत दिसून येईल. त्यांचा शपथविधी मोठ्या प्रमाणात होईल, अस शिरसाट यांनी सांगितलं.
भाजपचा शब्द गांभीर्याने घेऊ नये, असे संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. कोट्यवधी लोकांनी विश्वास ठेवला, भाजप असो की शिवसेना मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आलेत ना. काहीतरी कारण असेल ना. संजय राऊत फक्त जनतेला गृहीत धरू शकतो. जनता मूर्ख आहे असं समजून जे तुम्ही राजकारण करत होता ना, जनतेने तुम्हाला ( विरोधकांना) तुमची जागा दाखवली आहे. तुम्हाला जो अहंकार होता ना, आमचा चेहरा घेऊन चाला, ही भाषा होती ना तुमची, आता हे चेहरे पहायचीसुद्धा लोकांची इच्छा नाही त्यामुळे लोकांनी तुमच्याविरोधात मतं दिली. तुमचा चेहरा तुम्हीच आता आरशात पहा आणि ठरवा कोणाचा चांगला आहे ते असा टोमणा शिरसाट यांनी लगावला.