अखेर एकनाथ शिंदेंची तलवार म्यान, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच ?

0
3

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पु्न्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली. या साऱ्या घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी शिंदे यांच्याकडून दबावाचे राजकारण सुरू झाले होते. महायुतीच्या यशात आपले अधिक योगदान असल्याने किमान दोन ते अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच कायम राहावे, अशी शिंदे यांची भूमिका होती. शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी उघडपणे मागणी करण्यात येत होती. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही शिंदे यांचीच मुख्यमंत्रीपदी फेरनिवड करावी, असा आमदारांचा सूर होता. सोमवारी दिवसभर शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले होते. लाडकी बहिणी, आरोग्य सेवा, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थींना पुढे करून शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी करण्यात आली.

राज्यभर विविध मंदिरांमध्ये महाआरती, पूजाअर्चा करण्यात आली. शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली. मंगळवारी मुख्यमंत्री शिंदे हे राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करण्यापूर्वी मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शिवसेनेची योजना होती. त्यासाठी ठाणे, मुंबईत विभागप्रमुखांकडून कार्यकर्त्यांना ‘वर्षा’ निवासस्थानी जमण्याचे आदेश देण्यात आला होता. सोमवारी मध्यरात्री बहुधा सूत्रे फिरली असावीत. कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यरात्री १२.५३ मिनिटाने एक्स समाज माध्यमावरून कार्यकर्त्यांनी वर्षा किंवा अन्य कुठे जमू नये, असे बजावले. तसेच महायुती भक्कम असल्याचा निर्वाळा दिला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा देण्याची औपचारिकता पूर्ण केल्यावर शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर सौम्य भूमिका घेतली.