…. तर ठाकरेंची शिवसेना पुन्हा नव्या दमाने उभी राहण्याची चिंता

0
3

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : महायुतीला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठं बहुमत मिळाले. पण मुख्यमंत्री पदावरून घोडं अडलं आहे. महायुतीमध्ये भाजपाच्या 132 जागा आल्या आहेत. त्यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती असल्याचा दावा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या लोक कल्याणकारी धोरणाना सुद्धा श्रेय दिल्या जाते. आता अडचण ही आहे की, राज्यात एकाच वेळी दोन मुख्यमंत्री करता येत नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. तर शिंदे सेना बिहार मॉडलची चर्चा करताना दिसत आहे. शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नाव लावून धरले आहे. तर देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा श्रेष्ठींचे पहिली पसंत आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. पण तसं करताना या तीन मुद्दांना भाजपाला दुर्लक्ष करून चालणार नाही.

भारतीय जनता पक्ष गेल्या दशकापासून सोशल इंजिनिअरिंगला अधिक महत्त्व देत आला आहे. त्यामुळे मुख्य पदावर ओबीसी चेहरा असणे सर्वात चांगले, अशी एक धारण आहे. भाजपाने राष्ट्रपतीपासून ते राज्यपालांपर्यंत अनुसूचित जाती-जमातींना प्राधान्य दिले आहे. सध्या जातनिहाय जनगणनेविषयी राहुल गांधी आक्रमक दिसत असतानाच ओबीसी मतांवर ब्राह्मण मुख्यमंत्री पदावरून विरोधक हल्लाबोल करू शकतात. विरोधक अगोदरच भाजपाला सवर्ण आणि श्रीमंतांचा पक्ष म्हणून निशाणा करत आहे. ज्या समाजाची जितकी लोकसंख्या, तितका त्याचा अधिकार अशी चर्चा सुरू आहे. आता बिहार आणि दिल्लीतील निवडणुका तोंडवर असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर फडणवीस यांचे नाव पुढे करताना भाजपाला हा मुद्दा अडचणीचा ठरण्याची चिन्हं आहेत.

महायुतीचं सरकार येण्यासाठी त्यावेळीचे शिवसेनेतील बंड महत्त्वाचे ठरले होते. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 जागांवर यश मिळवले आहे. तर अजित पवारांकडे 41 आमदारांचं संख्याबळ आहे. जर वाटाघाटी सामोपचाराने झाल्या नाही तरी भाजपाकडे अजितदादांच्या भरवशावर सत्ता स्थापनेला अडचण नाही. पण राजकीय तज्ज्ञांच्या मते हा धोका भाजपा स्वीकारणार नाही. एकनाथ शिंदे यांना डावलून अथवा त्यांची नाराजी ओढवून सत्तेत वाटेकरी होण्याचा मार्ग भाजपाला अडचणीचा ठरेल. दुसरीकडे वाटाघाटी फिसकटल्या तर शिंदे यांचे 57, अजितदादांचे 41 आणि महाविकास आघाडीचे 46 असे मिळून सत्ता स्थापन केल्यास हा आकडा 144 पर्यंत येतो. 288 आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी या नवीन आघाडीला सुद्धा एक जागा कमी पडू शकते.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची नाराजी एकदम समोर आली. मराठा पट्ट्यात भाजपाला मोठा फटका बसला. मराठा समाजाची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दिसून आली. मनोज जरांगे पाटील यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उघड मोर्चा उघडला. राज्यात मराठा आणि ओबीसी असा सामना सर्वांनीच पाहिला आहे. फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्यास हा धोका समोर येऊ शकतो.